भारतीय अर्थव्यवस्था सर्वात वेगवान
‘आयएमएफ’चा भारतावर विश्वास : यापूर्वी जागतिक बँक, डेलॉईटकडूनही कौतुकाची थाप
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेने 50 टक्के इतकी भयंकर व्यापार शुल्क आकारणी केलेली असूनही, भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचा दावा आयएमएफ म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून करण्यात आला आहे. ‘आयएमएफ’सह अनेक जागतिक संस्थांनी भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रगती गतिमान असल्याची बाब मान्य केली आहे. अमेरिकेच्या अतिरिक्त टॅरिफनंतरही भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये राहील, असा विश्वास वर्तवण्यात आला आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेबाबत परदेशातून चांगल्या बातम्या येत आहेत. जागतिक बँकेने यापूर्वी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला असताना, आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये राहील असे म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या 50 टक्के कर आकारणीनंतरही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे. आयएमएफने त्यांच्या अलीकडील जागतिक आर्थिक दृष्टिकोन अहवालात आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये देशाचा जीडीपी विकासदर 6.6 टक्के राहील, असे भाकित व्यक्त केले आहे. यात महत्त्वाचे म्हणजे जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला चीन देखील भारतापेक्षा खूप मागे राहील, असेही मत मांडले आहे.
भारताने 2025-26 आर्थिक वर्षात चांगली सुरुवात करताना एप्रिल-जून तिमाहीत 7.8 टक्के जीडीपी वाढ नोंदवली आहे. ही वाढ अपेक्षेपेक्षा खूपच जास्त असल्याने जागतिक पातळीवरील विविध संस्थांनी भारतावर विश्वास व्यक्त केला आहे. पहिल्या तिमाहीतील मजबूत आर्थिक व्यवहारांना अनुसरून आता 6.6 टक्के हा उच्च अंदाज ‘आयएमएफ’कडून लावण्यात आला आहे. 2026 साठी भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज त्यांनी 6.2 टक्के पर्यंत कमी केला आहे. तथापि, देशाचा विकास 6.3 टक्के ते 6.8 टक्क्यांदरम्यान राहणार असून स्टार्टअप्स, नवोन्मेष आणि पायाभूत सुविधांमधील भरभराट भारताला नवीन उंचीवर घेऊन जाईल, असा विश्वास भारत सरकारला आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीचे संकेत
आयएमएफच्या मते भारताच्या तुलनेत चीनची गती संथ राहणार आहे. चीनची जीडीपी वाढ 4.8 टक्के राहील असा अंदाज आहे. शिवाय, जागतिक अर्थव्यवस्थेबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने यावर्षी 3.2 टक्के वाढीचे भाकित वर्तवले आहे. तर, 2026 मध्ये 3.1 टक्के असू शकते. हे प्रमाण पूर्वीच्या अंदाजापेक्षा कमी आहे. प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये स्पेन 2.9 टक्के जीडीपी वाढीसह आघाडीवर राहू शकतो. अमेरिकेसाठी 1.9 टक्के विकासदराचा अंदाज आहे. संरक्षणवाद, भू-राजकीय तणाव आणि कामगार बाजारातील बदल जागतिक विकास मंदावू शकतात, असा इशारा आयएमएफने दिला आहे.
जागतिक बँकेकडूनही भारताची वाहव्वा
आयएमएफच्या आधी जागतिक बँकेने देखील भारताच्या जलद वाढीवर विश्वास व्यक्त केला होता. अलीकडेच जागतिक बँकेने भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला. मजबूत स्वदेशी वापर आणि शेती आणि ग्रामीण मजुरीच्या सुधारित कामगिरीमुळे 2026 आर्थिक वर्षासाठी भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज पूर्वीच्या 6.3 टक्क्यांवरून 6.5 टक्क्यांपर्यंत वाढवला जात आहे.
‘डेलॉइट’ देखील भारतीय अर्थव्यवस्थेवर सकारात्मक
केवळ जागतिक बँक आणि आयएमएफच नाही तर ‘डेलॉइट इंडिया’नेही भारतीय अर्थव्यवस्थेच्या सतत वाढीची पुष्टी केली आहे. त्यांच्या अलीकडील अहवालात, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 6.7-6.9 टक्के दराने वाढेल, असे म्हटले होते. विकासाचा अंदाज वाढवताना ‘डेलॉइट’ने महत्त्वाचे भाष्यही केले होते. विकासाच्या अंदाजातील ही वाढ भारत बहुतेक देशांपेक्षा मजबूत होत असल्याची एक नवीन भावना दर्शवते, असे स्पष्ट करण्यात आले होते.