For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय श्वान अमेरिकेत शांतीदूत

06:09 AM Jan 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय श्वान अमेरिकेत शांतीदूत
Advertisement

सध्या अमेरिकेत एका श्वानाची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात झाली आहे. हा श्वान भारतीय आहे आणि तो अमेरिकेत ‘शांतीदूत’ म्हणून प्रसिद्धी पावलेला आहे. या श्वानाची कथा अत्यंत स्वारस्यपूर्ण आहे. त्याचे नाव ‘अलोका’ असे ठेवण्यात आले आहे. तो एक सोडून दिलेला श्वान असून नंतर त्याला काही भिक्षुंनी सांभाळले. हे बौद्ध भिक्षू काही काळापूर्वी भारतात शांती यात्रा करत असताना त्यांना हा श्वान अतिशय वाईट अवस्थेत सापडला. त्यांनी त्याला सांभाळायचा निर्णय घेतला. त्यानंतर तो या भिक्षुंच्या गटासह वास्तव्य करु लागला. प्रारंभी त्याला बऱ्याच संकटांना सामोरे जावे लागले होते. एकदा त्याला एका कारने धडक दिल्याने तो बराच घायाळ झाला होता. त्यानंतर पुष्कळ दिवस तो आजारी होता. त्याला सांभाळणाऱ्या भिक्षुंनी त्याला आराम वाटावा म्हणून एका ट्रकमध्ये बसविले. तथापि, या ट्रकमधून तो उडी मारुन बाहेर आला आणि भिक्षुंसह वाटचाल करु लागला.

Advertisement

हे भिक्षू विविध देशांमध्ये शांतीयात्रा करत आहेत. त्यांनी 26 ऑक्टोबर 2025 या दिवससापासून अमेरिकेच्या टेक्सास प्रांतापासून आणखी एका शांतीयात्रेचा प्रारंभ केला आहे. ही शांतीयात्रा अमेरिकेच्या 10 प्रांतांमध्ये संचार करणार असून तिचा समारोप अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे होणार आहे. ही पदयात्रा असून या शांतीयात्रेत ‘अलोका’ही समाविष्ट झाला आहे. ही यात्रा 110 दिवसांची आहे. या यात्रेची जितकी चर्चा अमेरिकेत आहे, तितकीच या श्वानाचीही होत आहे. हे भिक्षू ज्या देशांमध्ये शांतीयात्रेसाठी जातात, तेथे हा श्वानही त्यांच्यासह असतोच. त्यामुळे या श्वानाची ख्याती शांतीदूत अशी झाली असून तो शांतता आणि अहिंसा यांचे प्रतीक मानला जात आहे. अमेरिकेतले अनेक लोकही त्याला शांतीदूत म्हणून मान देत आहेत. भिक्षूंची ही यात्रा या श्वानाच्या सहभागामुळे अधिकच प्रसिद्ध झाली असून विविध माध्यमांवर आज या श्वानाची चर्चा आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.