भारतीय मुत्सद्यांना पाकिस्तानकडून त्रास
निवासस्थानांचा गॅसपुरवठा रोखला : पुरवठादारांना सिलिंडर न देण्याचा निर्देश : मिनरल वॉटर, वृत्तपत्र पुरविणेही बंद
वृत्तसंस्था/इस्लामाबाद
पाकिस्तानने इस्लामाबादमध्ये तैनात भारतीय मुत्सद्द्यांच्या निवासस्थानांचा गॅसपुरवठा रोखला आहे. याचबरोबर स्थानिक गॅस सिलिंडर पुरवठादारांना भारतीय मुत्सद्यांना सिलिंडर विक्री न करण्याचा निर्देश देण्यात आला आहे. पाकिस्तानने याचबरोबर मिनरल वॉटर आणि वृत्तपत्रांचा पुरवठाही रोखला आहे. पाकिस्तानने हा निर्णय भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर सूडाच्या कारवाईदाखल घेतला आहे. हे पाऊल पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या कटाचा हिस्सा आहे. याच्या अंतर्गत पाकिस्तान सूडाच्या छोट्या-छोट्या कारवाई करत आहेत. तर प्रत्युत्तरादाखल भारताने देखील दिल्लीत तैनात पाकिस्तानी मुत्सद्यांपर्यंत वृत्तपत्रं पोहोचणे बंद केले आहे.
पाकिस्तानकडून यापूर्वीही असे कृत्य
2019मध्ये पुलवामा हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने पाकिस्तानात एअरस्ट्राइक केला होता. त्यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारतीय मुत्सद्यांना अशाचप्रकारे त्रास दिला होता. त्यावेळी भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया, उपउच्चायुक्त जे.पी. सिंह आणि नौदल सल्लागारासमवेत अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना अशाचप्रकारच्या वर्तनाला सामोरे जावे लागले होते. या घटनांमध्ये सातत्याने पाठलाग करणे, सुरक्षाकर्मचाऱ्यांची चौकशी करणे आणि खोटे फोन कॉल करणे यासारखी कृत्ये सामील होती. इस्लामाबामध्ये भारतीय मुत्सद्द्यांना त्रास देण्याच्या 19 घटना घडल्या. मुत्सद्द्यांच्या छळात या वाढीनंतर भारतीय उच्चायोगाने हा मुद्दा पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयासमोर उपस्थित केला होता.
व्हिएन्ना कराराचे उल्लंघन
गॅस, पाणी आणि वृत्रपत्रांचा पुरवठा रोखण्याचा पाकिस्तानचा निर्णय व्हिएन्ना कन्व्हेंशन ऑन डिप्लोमॅटिक रिलेशन्स (1961)चे उल्लंघन आहे. कन्व्हेंशनच्या कलम 25 नुसार यजमान देशाला राजनयिक मिशनच्या सुरळीत कामकाजासाठी सर्व सुविधा पुरवाव्या लागतात. पाकिस्तानने जाणूनबुजून हा मूलभूत पुरवठा रोखून मिशनचे कामकाज आणि मुत्सद्द्यांच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण केले आहेत. मुत्सद्द्यांना भयमुक्त आणि हस्तक्षेपाशिवाय काम करता यावे हा व्हिएन्ना कराराचा उद्देश आहे. पाकिस्तानची ही कृत्यं थेट स्वरुपात दबावाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.