भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंडला प्रयाण
वृत्तसंस्था / मुंबई
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने शुक्रवारी इंग्लंडला प्रयाण केले. भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून 2025-27 च्या आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली त्याचप्रमाणे रविचंद्रन अश्विन या अनुभवी खेळाडूंच्या निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी मालिकेसाठी हा पहिलाच दौरा आहे. ही कसोटी मालिका जून ते ऑगस्ट दरम्यान खेळविली जाणार आहे. या मालिकेतील सामने लिड्समधील हेंडीग्ले मैदानावर, बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर, लंडनच्या लॉर्डस् आणि ओहल मैदानावर त्याचप्रमाणे मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर होतील.
गेल्या महिन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतीय निवड समितीने शुभमन गिल या सलामीच्या फलंदाजाकडे कप्तानपदाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला. 2007 पासून भारताने आतापर्यंत इंग्लंडमध्ये एकही कसोटी मालिका जिंकली नाही. या आगामी कसोटी मालिकेसाठी पूर्वतयारी करण्याच्या हेतूने संघातील काही खेळाडूंनी यापूर्वीच इंग्लंडमध्ये आपले वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला. आता या कसोटी मालिकेपूर्वी दोन सरावाचे सामने सुरू आहेत. इंडिया अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात दोन सामन्यांची अनधिकृत कसोटी मालिका खेळविली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला असून दुसरा सामना सध्या सुरू आहे. इंडिया अ संघ इंग्लंड लायन्स संघाबरोबर तीन सामन्यांची अनधिकृत कसोटी मालिका खेळत आहे.
भारतीय कसोटी संघ : शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रे•ाr, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, जसप्रित बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव.