भारतीय कंपन्यांनी विकल्या 41 लाख कार
नव्या विक्रमाची नोंद : देशात प्रथमच वार्षिक विक्रीत मोठी चमक : 1.9 कोटींची दुचाकी विक्री
नवी दिल्ली :
भारतामध्ये कारची किरकोळ विक्री प्रथमच एका वर्षात 40 लाख कोटींच्या घरात पोहोचली आहे. वर्ष 2024 च्या दरम्यान देशामध्ये 40.73 लाख कारची विक्री झाली. 2023 मध्ये 38.73 लाख कार विक्रीच्या तुलनेत 5.18 टक्क्यांनी कार विक्री अधिक राहिली आहे, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल्स असोसिएशन (फाडा) यांनी दिली आहे.
मागील वर्षात दुचाकींची किरकोळ विक्री ही 10.78 टक्क्यांनी वधारुन 1.89 कोटींवर पोहोचली आहे. या तुलनेत वर्ष 2023 मध्ये ही स्थिती 1.71 कोटींवर राहिली आहे. दरम्यान दुचाकींची विक्री ही सध्या कोविड पूर्वच्या पातळीवर राहिली आहे. कोविड 19 च्या अगोदर देशात दुचाकींची वर्षाला विक्री 2.1 कोटी इतकी विक्रमी झाली होती.
व्यावसायिक वाहनांची विक्री स्थिर
फाडाचे अध्यक्ष सी.एस विग्नेश्वर यांनी म्हटले आहे की, मागील वर्षात अधिकची उष्णता, निवडणुका आणि पावसाचा मारा या अडचणींच्या स्थितीतही वाहनांची एकूण किरकोळ विक्री 9.11 टक्क्यांनी वधारली. तसेच व्यावसायिक वाहनांची किरकोळ विक्रीत फरसा मोठा बदल झाला नाही. कार विक्री ही प्रामुख्याने जाळे विस्तारणे आणि नवीन मॉडेल बाजारात आल्यामुळे वाढली असल्याचे दिसून आले.
45 लाखांचे वाहन विक्रीचे ध्येय
चालू वर्षात कार विक्रीचे जवळपास 45 लाखांच्या विक्रीचे ध्येय वाहन उद्योगाने निश्चित केले आहे. यामध्ये दुचाकींची विक्री ही कोविड पूर्वच्या वर जाण्याचा अंदाज व ईव्ही वाहनांची हिस्सेदारी वाढण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे.