For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय नागरिकाचा इटलीत मृत्यू

06:22 AM Jun 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय नागरिकाचा इटलीत मृत्यू
Advertisement

मेलोनी यांच्याकडून चिंता व्यक्त, इटलीत निदर्शने

Advertisement

वृत्तसंस्था / रोम

इटली या देशामध्ये एका भारतीय नागरिकाचा अत्यंत भीषण स्थितीत मृत्यू झाला आहे. ही घटना 19 जूनची आहे. सतनामसिंग नामक हा भारताच्या पंजाब राज्यातील नागरिक इटलीमध्ये कामासाठी गेला होता. यंत्रावर काम करीत असताना त्याचा अपघाताने हात कापला गेला होता. मात्र, त्याच्या मालकाने त्याच्यावर उपचार करण्याऐवजी त्याला रस्त्यावर सोडून दिले होते. रस्त्यावरच त्याचा तडफडून मृत्यू झाला होता. या घटनेचे जोरदार पडसाद इटली देशात उमटले आहेत.

Advertisement

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिओ मेलोनी यांनी या घटनेसंबंधी चिंता व्यक्त केली आहे. स्थलांतरित कामगारांची स्थिती कशी आहे, याचे हे उदाहरण आहे. त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आता नव्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी या घटनेचे वृत्त समजल्यानंतर व्यक्त केली आहे.

शेतमजुराचे काम

सतनामसिंग हा इटलीतील एका शेतमालकाकडे शेतमजूर म्हणून काम करीत होता. तो मूळचा पंजाबमधील चांद नवान या खेड्यातील होता. तो काम करीत असताना अपघातात जखमी झाल्यानंतर त्याला त्याच्या मालकाने जनावरापेक्षाही वाईट पद्धतीने वागविले. त्याला अन्नपाणी आणि उपचारही पुरेसे देण्यात आले नाहीत. भारतात परत पाठविण्याचीही व्यवस्था करण्यात आली नाही. 22 जूनला त्याच्या मालकाने त्याला कारमधून उपचारांच्या आमिषाने नेले आणि रस्त्यातच त्याला सोडून दिले. तेथे दोन दिवसांनी त्याचा अतिशय दयनीय अवस्थेत मृत्यू झाला, अशी माहिती त्याच्या भारतातील नातेवाईकांनी दिली. इटलीतील भारतीय दुतावासाशीही त्याला संपर्क करु दिला गेला नाही, असा आरोप त्यांनी केला.

कारवाईची मागणी

सतनामसिंग याच्या मालकाचे नाव रेंझो लोव्हाटो असल्याची माहिती देण्यात आली. त्याच्याविरोधात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता इटलीत करण्यात येत आहे. इटलीच्या काही मानवाधिकार संघटनाही आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. अद्याप या मालकाला अटक करण्यात आलेली नाही. तथापि, आता इटलीच्या प्रशासनाने या प्रकरणात गंभीरपणे लक्ष घातले आहे. इटलीतील भारतीय दुतावासानेही सतनामसिंग याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. भारत सरकारनेही यात लक्ष घालावे, अशी मागणी सतनामसिंग याच्या भारतातील नातेवाईकांनी केली आहे. त्याच्या मृत्यूचे वृत्तही आम्हाला लवकर कळविण्यात आले नाही, असे त्याच्या वडिलांचे म्हणणे आहे. मृत्यूपूर्वी त्याचे भारतातील नातेवाईकांशी बोलणे झाले होते. तथापि, त्याला अपघात झाल्यानंतर मात्र, त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

Advertisement
Tags :

.