For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रकुलमध्ये भारतीय बॉक्सिंग संघाची चमक

06:56 AM Aug 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रकुलमध्ये भारतीय बॉक्सिंग संघाची चमक
Advertisement

गुलवीर एकाच आवृत्तीत दोन पदके जिंकणारा  पहिला भारतीय, अंकुश पांघल, सिवाच यांना सुवर्ण, नरेंद्र बेरवालला रौप्य, ज्युडोका उन्नती शर्माला कांस्य 

Advertisement

वृत्तसंस्था/ ग्लासगो

2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 16 पदके जिंकत 10 व्या दिवशी केलेल्या दमदार कामगिरीमुळे भारत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला. या कामगिरीमुळे भारताची एकूण पदकांची संख्या 39 वर  पोहोचली असून यामध्ये (13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य) यात बॉक्सिंग पथकाचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.

Advertisement

गुलवीर सिंगचा नवा इतिहास

स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी लांब पल्ल्याचा धावपटू गुलवीर सिंगने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकल्यानंतर त्याने पुरुषांच्या 5,000 मीटर शर्यतीत कांस्य पदक पटकावले. स्पर्धेच्या एकाच आवृत्तीत दोन पदके जिंकणारा तो पहिला भारतीय ट्रॅक अँड फील्ड अॅथलीट ठरला आहे, तसेच 5,000 मीटर शर्यतीत राष्ट्रकुल पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. आशियाई विजेतेपद धारण करणाऱ्या गुलवीरने 13 मिनिटे 24.95 सेकंदांची वेळ नोंदवत ही ऐतिहासिक दुहेरी कामगिरी पूर्ण केली.

बॉक्सिंगच्या पदक तालिकेत भारत अव्वल स्थानी राहिला

नरेंद्र बेरवाल, ऑलिम्पिक पदक विजेती लव्हलिना बोरगोहेन आणि जादुमणी सिंग या तीन भारतीय बॉक्सर्सना रौप्य पदकांवर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या 90 किलोहून अधिक गटाच्या अंतिम फेरीत नरेंद्रचा इंग्लंडच्या डमार थॉमसकडून एकमताने पराभव झाला. महिलांच्या 75 किलो गटाच्या अंतिम फेरीत लव्हलिनाला ऑस्ट्रेलियाच्या एम्मा-सू ग्रीनट्रीकडून 4-1 असा पराभव पत्करावा लागला. प्रीतीने कॅनडाच्या स्कारलेट डेलगाडोवर 5-0 असा दणदणीत विजय मिळवत महिलांच्या 54 किलो गटाचे बॉक्सिंग सुवर्णपदक पटकावले. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये, पुरुषांच्या 80 किलो गटाच्या अंतिम फेरीत अंकुश पांघलने इंग्लंडच्या डिमेजी शिट्टूचा 4-1 असा पराभव केला, तर सचिन सिवाच याने पुरुषांच्या 60 किलो गटाचे विजेतेपद मिळवताना नामिबियाच्या ट्रायअगेन मॉर्निंग न्डेवेलोवर 3-2 असा निसटता विजय मिळवला.

ज्युडोत उन्नतीला कांस्यपदक

कांस्यपदकाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या स्काय नोस्टरविरुद्ध ‘इप्पॉन‘द्वारे शानदार विजय मिळवत उन्नती शर्माने कांस्यपदक पटकावले. या लढतीत विजय मिळवण्यासाठी उन्नतीला केवळ 1 मिनिट 7 सेकंद लागले; तिने अचूक वेळेत ‘लेग हुक‘चा डाव साधला, ज्यामुळे तिची प्रतिस्पर्धी पाठीवर कोसळली आणि तिला ‘इप्पॉन‘ मिळाला, जो ज्युडोमधील सर्वोच्च गुण मानला जातो. याच गुणांवर तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

ईशान्य भारत नकाशातून वगळल्याने लव्हलिनाचा जाब

राष्ट्रकुलच्या अंतिम दिवशी भारतीय पथकातील बॉक्सर लव्हलिना बोरगोहेनने त्या नकाशात ईशान्य भारत वगळल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर रेस्टॉरंटने  भारतीय संघाला आश्वासन दिले आहे की ते त्यांच्या आवारात लावलेला भारताचा नकाशा दुरुस्त करतील. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने बॉक्सिंगमध्ये 10 पदके जिंकल्याच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर आयोजित केलेल्या सेलिब्रेशन डिनरदरम्यान रेस्टॉरंट व्यवस्थापनाशी जाब विचारण्यात आला.

Advertisement
Tags :

.