For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय बासमती तांदळाला इराण युद्धाची झळ

06:22 AM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय बासमती तांदळाला इराण युद्धाची झळ
Advertisement

समुद्रातच अडकली लाखो टनांची ऑर्डर

Advertisement

इराण-इस्रायल युद्धामुळे पश्चिम आशियाई देश पूर्णपणे होरपळून निघत आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग बंद झाल्याने आखातातील बहुतांश देशांकरता सागरी वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे भारतासमवेत जगातील बहुतांश देशांमध्ये कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा थांबला आहे. आखाती देशांना भारतातून होणारी तांदळाची निर्यातही ठप्प झाली आहे.

सुमारे 6 लाख टन तांदूळ समुद्रात

Advertisement

भारताकडून आखाती देशांना पाठविण्यात येणाऱ्या तांदळाचा ट्रान्झिट कालावधी सुमारे 40 दिवसांचा आहे. यात भारतीय बंदरावर लागणारा कालावधी, जहाजांवरील कालावधी आणि डेस्टिनेशन देशाच्या बंदरावर लागणारा कालावधी सामील आहे. सध्या तांदळाची निर्यात थांबली आहे, परंतु यापूर्वी पाठविण्यात आलेला सुमारे 6 लाख टन बासमती तांदूळ बंदरात, समुद्रात किंवा डेस्टिनेशन देशाच्या बंदरावर अडकून पडला असल्याचे ऑल इंडिया राइस एक्सपोर्ट्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष विजय सेतिया यांनी सांगितले.

हजारो कोटींची गुंतवणूक संकटात

सध्या विविध बंदरे आणि समुद्रात अडकून पडलेल्या भारतीय बासमती तांदळाच्या ऑर्डरचे मूल्य 5 ते 6 हजार कोटी रुपये आहे. निर्यातदारांचा माल मोठ्या प्रमाणात अडकून पडल्याने त्यांनी नवी ऑर्डर पूर्ण करण्यासाठीचे बॅगिंग किंवा पॅकिंगचे काम पूर्णपणे रोखले आहे. स्थिती सुधारल्यावर हे काम पुन्हा सुरू होणार असल्याचे सेतिया यांचे सांगणे आहे.

आखाती देशांना 70 टक्के निर्यात

भारतातून दरवर्षी सुमारे 60 लाख टन  बासमती तांदळाची निर्यात होते. यातील सुमारे 70 टक्के निर्यात आखाती देशांना होते. वर्षाकाठी सुमारे 45 लाख टन बासमती तांदळाची विक्री आखाती देशांना होत असते. यातील 6-7 लाख टन बासमती तांदळाची निर्यात इराणला होत राहिली आहे.  इराणला बासमती निर्यातीचा विक्रम 14 लाख टनाचा आहे. आता तेथे युद्ध पेटल्याने आखाती देशांना होणारी निर्यात ठप्प झाली आहे.

मागील वर्षी 60 लाख टनाची निर्यात

ऑल इंडिया राइस एक्सपोर्ट्स असोसिएशननुसार 2024-25 आर्थिक वर्षात भारतातून एकूण 60.65 लाख टन बासमती तांदळाची निर्यात करण्यात आली होती. रुपयांमध्ये याचे मूल्य 50,312 कोटी रुपये तर डॉलर्समध्ये 5.94 अब्ज डॉलर्स होते. भारतात 2024-25 मध्ये एकूण 15.01 कोटी टन तांदळाचे उत्पादन झाले होते. बासमती तांदळाचे उत्पादन 70-75 लाख टन होते. चालू आर्थिक वर्षादरम्यान एप्रिल ते डिसेंबरपर्यंत आखाती देशांना 32 लाख टनाहून अधिक बासमती तांदळाची निर्यात करण्यात आली आहे.

तांदळाचे दर घटणार

युद्ध लांबल्यास त्याचा प्रभाव लवकरच भारतातील बासमती तांदळाच्या किमतीवर दिसून येऊ शकते. बासमती तांदळाचे दर कमी होऊ शकतात. सध्या निर्यातदारांनी पॅकिंग रोखले असून ते वेट अँड वॉचच्या स्थितीत असल्याचे सेतिया यांचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :

.