For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय बॅडमिंटन संघ बाद फेरीत

06:27 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय बॅडमिंटन संघ बाद फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था/ चेंगडू (चीन)

Advertisement

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरु असलेल्या थॉमस चषक सांघिक आंतरराष्ट्रीय पुरूषांच्या बॅडमिंटन स्पर्धेत विद्यमान विजेत्या भारताने बाद फेरीत प्रवेश मिळविला. सोमवारी झालेल्या क गटीतील सामन्यात भारताने इंग्लंडचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला.

सोमवारी भारत आणि इंग्लंड यांच्यातील या लढतीतील पहिल्या एकेरी सामन्यात भारताच्या एच. एस. प्रणॉयने इंग्लंडच्या हॅरी हुवाँगचा 21-15, 21-15 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुहेरीच्या पहिल्या सामन्यात भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी इंग्लंडच्या बेन लेनी आणि सिन व्हेंडी यांचा 21-17, 19-21, 21-15 अशा गेम्समध्ये पराभव करत भारताची आघाडी वाढविली. हा दुहेरीचा सामना 65 मिनिटे चालला होता. मात्र सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांना विजयासाठी इंग्लंडच्या जोडीने 3 गेम्समध्ये झुंजविले. दुसऱ्या एकेरी सामन्यात भारताचा माजी टॉप सिडेड किदांबी श्रीकांतने इंग्लंडच्या नदीम दळवीवर 21-16, 21-11 अशा गेम्समध्ये विजय मिळविला. श्रीकांतच्या या विजयामुळे भारताची आघाडी 3-0 अशी भक्कम झाली. दुसऱ्या दुहेरीच्या सामन्यात एम. आर. अर्जुन आणि ध्रुव कपिला यांनी इंग्लंडच्या रोरी इस्टोन व अॅलेक्स ग्रीन यांचा 21-17, 21-19 असा पराभव केला. शेवटच्या एकेरी सामन्यात भारताच्या 24 वर्षीय किरण जॉर्जने इंग्लंडच्या चोलेन केयानवर 21-18, 21-12 अशी मात करत इंग्लंडचे आव्हान 5-0 असे एकतर्फी संपुष्टात आणले. या विजयामुळे भारतीय पुरूष बॅडमिंटन संघाने उपांत्यपूर्व फेरी (बाद फेरी) गाठली आहे. आता भारताची क गटातील शेवटची लढत आतापर्यंत 14 वेळेला थॉमस चषक जिंकणाऱ्या बलाढ्या इंडोनेशिया बरोबर येत्या बुधवारी खेळविली जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.