विश्व अॅथलेटिक्स रिलेमध्ये भारतीय खेळाडूंचा नवा राष्ट्रीय विक्रम
वृत्तसंस्था, गेबोरोनी (बोस्वाना)
येथे सुरू असलेल्या 2026 च्या विश्व अॅथलेटिक्स रिलेमध्ये सहभागी झालेल्या भारताच्या विविध पाच संघांना 2027 च्या विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध करता आली नसली तरी मिश्र सांघिक 4×100 मी. रिले प्रकारात भारताच्या स्पर्धकांनी नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला.
4×100 मिश्र सांघिक रिले प्रकारात रविवारी झालेल्या पात्रतेच्या पहिल्या फेरीत भारतीय धावपटूंना पहिल्या दोन संघांमध्ये स्थान मिळविता आले नाही. पण त्यांनी या क्रीडा प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम केला. बिजिंगमध्ये होणाऱ्या आगामी विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पात्रतेसाठी भारतीय संघाला पहिल्या दोन स्थानांमध्ये प्रवेश करणे जरुरीचे होते. पण ते साध्य झाले नाही. रगुलकुमार, नित्या गंधे, अनिमेश कुजुर आणि स्नेहा शानुवल्ली यांनी पात्रता फेरीमध्ये 41.35 सेकंदांचा अवधी घेत सहावे स्थान मिळविले. पण त्यांच्याकडून या क्रीडा प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला गेला. या क्रीडा प्रकारात चालू वर्षाच्या प्रारंभी चंदीगडमध्ये झालेल्या स्पर्धेत 42.30 सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम नोंदविला गेला होता.
4×400 मी. मिश्र रिले प्रकारात तिर्थेश शेट्टी, कुमारी सलोनी, निहाल विलियम आणि रशदीप कौर या भारतीय पथकाला पाचव्या स्थानावर पात्र फेरीमध्ये समाधान मानावे लागले. त्यांनी 3 मिनिटे 19.40 सेकंदांचा अवधी घेतला. महिलांच्या 4×100 रिले प्रकारात भारताच्या तमन्ना, नित्या गंधे, सुदेशना शिवांकर आणि स्नेहा शानुवेल्ली यांनी 53.90 सेकंदांचा अवधी घेत शेवटचे स्थान मिळविले. त्याचप्रमाणे पुरूषांच्या 4×100 भारतीय संघ अपात्र ठरला.