भारतीय तिरंदाजांचे तिसरे पदक निश्चित
वृत्तसंस्था/ फ्लोरिडा
येथे सुरु असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजपटूंनी आपले तिसरे पदक निश्चित केले आहे. 2028 ला होणाऱ्या लॉस एंजिल्स ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाजी या क्रीडा प्रकाराचा समावेश होण्याची शक्यता आहे.
विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत मिश्र सांघिक तिरंदाजी प्रकारात भारताच्या ज्योती आणि रुषभ यांनी स्पेनचा पहिल्या फेरीत 156-149 असा पराभव केला. त्यानंतर पुढील फेरीत भारताच्या तिरंदाजपटूंनी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत डेन्मार्कवर 156-154 अशी मात केली. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय तिरंदाजपटूंनी मिश्र सांघिक तिरंदाजी प्रकारात स्लोव्हेनियाचा 159-155 अशा गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता सुवर्णपदकासाठीच्या लढतीमध्ये भारत आणि चीन तैपेइ यांच्या लढत होणार आहे.
या स्पर्धेसाठी अमेरिकेतून आवश्यक असलेला व्हिसा भारतीय तिरंदाजपटूंना उशिरा मिळाल्याने भारतीय स्पर्धकांना या स्पर्धेसाठी वेळेत दाखल होता आले नाही. या स्पर्धेत भारताच्या पुरुष रिकर्व्ह संघाने यापूर्वीच अंतिम फेरी गाठली आहे. तरुणदीप राय आणि अतेनु दास या भारतीय पुरुष तिरंदाजपटूंनी स्पेनचा 6-2 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता भारत आणि चीन यांच्यात रविवारी सुवर्णपदकासाठी लढत होईल. या स्पर्धेत भारताने पहिले कांस्यपदक गेल्या बुधवारी पुरुषांच्या सांघिक कम्पाऊंड प्रकारात घेतले होते.