युक्रेनमध्ये पोहोचला भारताचा दारूगोळा
रशिया नाराज : युरोपीय देशांकडून पुरवठा
वृत्तसंस्था /कीव्ह
रशिया आणि युक्रेन युद्धाला आता सुमारे 3 वर्षांचा कालावधी झाला आहे. हा संघर्ष अद्याप शमण्याची चिन्हे नाहीत. याचदरम्यान या युद्धावरून धक्कादायक दावा करण्यात आला आहे. भारतीय शस्त्रास्त्र निर्मात्यांकडून विकण्यात येणारे तोफगोळे युरोपमार्गे युक्रेनमध्ये पोहोचले आहेत. रशियाच्या विरोधानंतरही भारताने या खरेदी-विक्रीला रोखण्यासाठी आतापर्यंत कुठलाच हस्तक्षेप केलेला नाही. अनेक भारतीय आणि युरोपीय अधिकाऱ्यांसोबत सीमा शुल्क डाटानुसार रशियाच्या विरोधात युक्रेनच्या हल्ल्यांसाठी दारूगोळ्याची ही निर्यात एक वर्षापेक्षा अधिक काळापासून होत आहे. पोक्रोवस्कमध्ये रशियन आक्रमण रोखण्यासाठी संघर्ष करत असलेल्या युक्रेनमध्ये दारूगोळ्याची मोठी कमतरता आहे.
शस्त्रास्त्रांच्या निर्यातीवरून भारतीय नियमांच्या अंतर्गत शस्त्रास्त्रांच वापर केवळ खरेदीदारच करू शकतात. रशियाने कमीतकमी दोनवेळा यासंबंधी मुद्दा उपस्थित केला असल्याचे भारतीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. जुलै महिन्यात रशियन विदेशमंत्री सर्गेई लावरोव्ह आणि विदेशमंत्री जयशंकर यांच्यात झालेल्या बैठकीत यासंबंधीचा मुद्दा उपस्थित झाला होता. तर पहिल्यांदाच दारूगोळ्याच्या या खरेदी-विक्रीचा तपशील समोर आला आहे. युक्रेनला भारतीय दारूगोळा पाठविणाऱ्या युरोपीय देशांमध्ये इटली आणि चेक प्रजासत्ताक या देशांचा समावेश आहे. हे देश युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या पुढाकाराचे नेतृत्व करत आहेत. तर रशिया आणि भारताच्या विदेश तसेच संरक्षण मंत्रालयांनी यासंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे देणे टाळले आहे.
भारताने युक्रेनला शस्त्रास्त्रs पाठविली नाहीत तसेच विकली देखील नाहीत असे भारतीय विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी जानेवारी महिन्यात नमूद केले होते. तर सूत्रांनुसार भारतात निर्मित शस्त्रास्त्रांचा युक्रेनकडून फारच कमी प्रमाणात वापर झाला आहे. युद्धानंतर युक्रेनकडून आयात करण्यातआलेल्या एकूण शस्त्रास्त्रांच्या 1 टक्क्यांपेक्षा हे कमी प्रमाण राहिले आहे. तर भारताकडून प्राप्त दारुगोळा युरोपीय देशांनी युक्रेनला विकला आहे का मोफत प्रदान केला आहे हे अद्याप समोर आलेले नाही. भारताचे रशियासोबत अत्यंत चांगले संबंध आहेत. रशिया हा भारताचा प्रमुख शस्त्रास्त्र पुरवठादार आहे. तर भारताने रशियाच्या विरोधात पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांमध्ये सामील होण्यास नकार दिला आहे. भारताने 2018-2023 दरम्यान सुमारे 3 अब्ज डॉलर्सची शस्त्रास्त्र निर्यात केली आहे.