अमेरिकेतील भारतीय राजदूत रडारवर
खलिस्तानी दहशतवादी पन्नूची नवी धमकी : रशियाचा केला उल्लेख
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूने पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. यावेळी त्याने अमेरिकेतील भारतीय राजदूत विनय क्वात्रा यांच्या विरोधात विष ओकत रशियालाही धमकाविले आहे. रशियाने खलिस्तान समर्थकांची गुप्त माहिती भारताला पुरविली आहे. अशास्थितीत रशियाच्या दूतावासांना आमची संघटना लक्ष्य करणार आहे. रशिया आणि भारतीय मुत्सद्दी विनय क्वात्रा यांना धडा शिकविला जाणार असल्याचे दहशतवादी संघटना शिख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंतने एका व्हिडिओद्वारे म्हटले आहे.
जगभरातील रशियन दूतावासांवर हल्ले करण्याची धमकी त्याने दिली आहे. रशियाने भारताला खलिस्तानी दहशतवादी कारवायांविषयी गुप्त माहिती पुरविण्यास सुरुवात केली आहे. रशियाला यापासून रोखण्यासाठी अमेरिका, युरोपीय महासंघ, ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडमधील रशियन मुत्सद्दी तसेच दूतावासांवर आम्ही हल्ले करणार आहोत असे पन्नूने म्हटले आहे.
अमेरिकेतील भारतीय राजदूत विनय क्वात्रा हे रशियन अधिकाऱ्यांच्या फारच गाठीभेटी घेत आहेत. क्वात्रा हे वॉशिंग्टन येथून रशियन मुत्सद्दी तसेच वाणिज्य दूतावासांसाब्sात समन्वय राखण्याचे काम करत आहेत. रशियन यंत्रणांकडून त्यांना खलिस्तान समर्थकांविषयी माहिती मिळत आहे. या माहितीच्या आधारावर खलिस्तान समर्थकांना लक्ष्य केले जात आहे. विनय क्वात्रा हे यापूर्वीच खलिस्तान समर्थकांच्या रडारवर आहेत असे पन्नूने म्हटले आहे.
खलिस्तान समर्थकांच्या विरोधात भारताला सहकार्य करणे रशियाने थांबवावे. रशियाने भारताला दिले जाणारे सहकार्य न रोखल्यास त्याला नुकसान सहन करावे लागणार असल्याची धमकी पन्नूने दिली आहे. मागील आठवड्यात न्यूयॉर्क आणि टोरंटोमध्ये रशियाच्या वाणिज्य दूतावासांबाहेर खलिस्तान समर्थकांनी निदर्शने करत भारतविरोधी घोषणाबाजी केली आहे.