चीन सीमेनजीक भारतीय वायुदलाचा युद्धाभ्यास
25 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबरपर्यंत होणार आयोजन : ईशान्येच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑपरेशन सिंदूरदरम्यान मे महिन्यात भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवादी अ•dयांवर अचूक हल्ला केला होता. आता वायुदल ईशान्येत स्वत:चा सर्वात मोठा युद्धाभ्यास आयोजित करणार आहे. हा युद्धाभ्यास 25 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. एक नोटीस टू एअरमेन (नोटॅम) जारी करण्यात आला असून तो आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मणिपूरच्या मोठ्या हिस्स्यांना व्यापणार आहे. हे क्षेत्र चीनच्या सीमेनजकी असून यात भूतान आणि म्यानमारचे हवाईक्षेत्रही सामील आहे.
हा 22 दिवसांचा वॅलिडेशन एक्सरसाइज असेल, जो 25 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता सुरु होईल. तर 16 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.29 वाजता समाप्त होणार आहे. हा ईशान्येतील मोठ्या हिस्स्याला प्रभावित करणार आहे, खासकरून सिलिगुडी कॉरिडॉरवर लक्ष केंद्रीत असणार आहे. सिलिगुडी कॉरिडॉरला ‘चिकन नेक’ म्हटले जाते, जो केवळ 22 किलोमीटर रुंदीचा आहे.
हा कॉरिडॉर ईशान्येतील 5 कोटी लोकांना उर्वरित भारताशी जोडतो. जर हा कॉरिडॉर संकटात सापडल्यास ईशान्येशी रस्तेसंपर्क तुटण्याची भीती आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय वायुदलाने याचमुळे सर्वात मोठा हवाई सराव आयोजित केला आहे. ऑपरेशन सिंदूर अद्याप जारी आहे. सैन्य सर्व सीमांवर हाय अलर्टवर आहे. हा सराव वायुदलाची मोहिमात्मक तयारी सुनिश्चित करणार आहे.
ईशान्येचे रणनीतिक महत्त्व
ईशान्य क्षेत्र भारत रणनीतिक स्वरुपात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हे क्षेत्र चीन, भूतान आणि म्यानमारला लागून आहे. येथे सिलिगुडी कॉरिडॉर सर्वात संवेदनशील असून तो बंगालला आसामशी जोडतो. याचमुळे भारताने या क्षेत्रात स्वत:ची सैन्य उपस्थिती मजबूत केली आहे. त्रिशक्ती कोरला (17 माउंटेन डिव्हिजन) वाढविण्यात आले असून ती ईशान्येत तैनात आहे. तसेच अत्याधुनिक हवाई सुरक्षा यंत्रणा एस-400 तैनात करण्यात आली आहे. हसीमारा वायुतळावर राफेल लढाऊ विमानांची स्क्वाड्रन असून ती या युद्धाभ्यासात भाग घेणार आहे.
युद्धाभ्यासाचे स्वरुप
हा युद्धाभ्यास वायुदलाची मोहिमात्मक कक्षा वाढविण्यावर केंद्रीत असेल, यात संयुक्त एअर-ग्राउंड ऑपरेशन्स असतील, जेथे अनेक वायुतळांवरून फ्रंटलाइन एअरक्राफ्ट म्हणजेच राफेल, सुखोई-30 मिग-29 आणि तेजस सामील होईल. सिलिगुडी कॉरिडॉरचे संरक्षण आणि त्वरित तैनातीचा सराव यात केला जाणार आहे. वायुदल सध्या आधुनिकीकरणाला जोर देत आहे, यात बहुउद्देशीय लढाऊ विमानांची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या युद्धाभ्यास केवळ तयारी वाढविणारा नसून आंतरराष्ट्रीय सहकार्यही मजबूत करणार आहे.