भारताने काळी जादू करुन जिंकली मॅच !
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
आयसीसी चँपियन्स करंडकाच्या मॅचमध्ये भारताने नुकतेच पाकिस्तानला लोळविले आहे. मात्र, हा विजय भारताने ‘काळी जादू’ करुन जिंकला, असा सनसनाटी आरोप काही पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भारताने या कामासाठी दुबईला 22 हिंदू पंडितांना पाठविले होते. त्यांनी सामन्याआधी मैदानाच्या परिसरात जाऊन ही काळी जादू केली. त्यामुळे पाकिस्तानचा पराभव झाला, असा प्रचार पाकिस्तानमध्ये केला जात आहे.
पाकिस्तानच्या ‘डिस्कव्हर पाकिस्तान’ या टीव्ही चॅनेलवरुन पाकिस्तानच्या पराभवाचे विश्लेषण करणारा एक कार्यक्रम सोमवारी प्रसारित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अनेक तज्ञांनी भारताने काळी जादू केल्याचा आरोप केला. ही काळी जादू करता यावी, म्हणूनच भारताने पाकिस्तानमध्ये या स्पर्धेचा एकही सामना खेळण्यास नकार दिला होता, असेही तर्कट या कार्यक्रमात सहभागी असणाऱ्यांनी लढविले होते. पाकिस्तानच्या 11 खेळाडूंसाठी भारताने प्रत्येकी 2 या प्रमाणात 22 हिंदू पंडितांची नियुक्ती केली होती. या हिंदू पंडितांनी काळी जादू करुन पाकिस्तानच्या खेळाडूंचे लक्ष विचलित केले. परिणामी पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. ही काळी जादू करण्यात आली नसती, तर पाकिस्तानवर अशी नामुष्की ओढविली नसती, असे या चॅनेलचे म्हणणे होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
भारत चांगला कसा खेळतो ?
खरेतर भारताचा संघ इतका काही चांगला नाही. तरीही तो इतके चांगले क्रिकेट खेळतो कसे ? त्यामागे काळी जादू हेच कारण असले पाहिजे. अन्यथा भारतीय संघाला असा खेळ जमलाच नसता, असेही मत याच चॅनेलवर आणखी एका तज्ञाने नोंदविले आहे. यामुळे पाकिस्तानची जगभर चेष्टा होत आहे.