तैवान अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला सहा सुवर्ण
वृत्तसंस्था/ तैपेई सिटी
रविवारी येथे झालेल्या तैवान खुल्या आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने 6 सुवर्णपदकांची कमाई केली. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताच्या महिला अॅथलेट्सनी 800 मी. धावणे आणि लांब उडी या क्रीडा प्रकारात सुवर्णपदके मिळवली.
या स्पर्धेत भारतीय स्पर्धकांची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद झाली आहे. भारताच्या विथ्या रामराज, रोहित यादव, पूजा, कृष्णन कुमार आणि अनू राणी यांनी विविध क्रीडा प्रकारात सुवर्णपदकांची कमाई केली. त्याचप्रमाणे पुरुषांच्या 4×400 मी. रिलेमध्ये टी. संतोष, विशाल, धर्मवीर चौधरी आणि टी. एस. मनू यांनी सुवर्णपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात त्यांनी 3 मिनिटे, 05.58 सेकंदाचा अवधी घेत नवा स्पर्धा विक्रम नोंदविला. पुरुषांच्या 400 मी. अडथळा शैर्यतीत यशहास पालाक्षाने रौप्य पदक मिळविताना 42.22 सेकंदाचा अवधी घेतला. पालाक्षाची ही या क्रीडा प्रकारातील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.
महिलांच्या 400 मी. अडथळ्याच्या शर्यतीत विथ्या रामराजने 56.53 सेकंदाचा अवधी घेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. चालू वर्षीच्या अॅथलेटिक हंगामात विद्याची ही या क्रीडा प्रकारातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी आहे. या कामगिरीमुळे तिला आगामी विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी मानांकन गुणामध्ये वाढ होण्यास मदत मिळेल. तामिळनाडूच्या विथ्या रामराजने या स्पर्धेत महिलांच्या 400 मी. अडथळा शर्यत, 400 मी. धावणे आणि 4×400 मी. रिले या क्रीडा प्रकारात आपला सहभाग दर्शविला होता. यापूर्वी झालेल्या फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत तिने या क्रीडा प्रकारात 56.04 सेकंदाचा अवधी तर आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने 56.46 सेकंदाचा अवधी नोंदविला होता.
पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या रोहित यादवने सुवर्णपदक मिळविताना 74.42 मी. ची नोंद केली. मात्र रोहितला या स्पर्धेत 75 मी. ची मर्यादा ओलांडता आली नाही. या क्रीडा प्रकारात तैपेईच्या फेंगने 74.04 मी. ची नोंद करत रौप्य पदक तसेच तैपेईच्या तेसूनने 73.95 मी. चे अंतर नोंदवित कांस्यपदक घेतले. महिलांच्या 800 मी. धावण्याच्या शर्यतीत पूजाने 2 मिनिटे 02.79 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक तर भारताच्या ट्विंकल चौधरीने 2 मिनिटे 06.96 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात पूजाने नवा स्पर्धा विक्रम केला आहे. पुरुषांच्या 800 मी. धावण्याच्या शर्यतीत भारताच्या कृष्णन कुमारने सुवर्णपदक मिळविताना 1 मिनिट 48.46 सेकंदाचा अवधी घेतला. कृष्णन कुमारचा या क्रीडा प्रकारातील हा नवा स्पर्धा विक्रम आहे.
महिलांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या अनू राणीने सुवर्णपदक मिळविताना 56.82 मी. ची नोंद केली. लंकेच्या लेकमालगेने रौप्यपदक तर तैपेईच्या चू ने 53.03 मी. ची नोंद करत कांस्यपदक घेतले. महिलांच्या लांब उडी प्रकारात ऑस्ट्रेलियाच्या डेल्टा अॅमेझोव्हेस्कीने 6.49 मी. ची नोंद करत सुवर्णपदक तर भारताच्या शाली सिंगने 6.41 मी. ची नोंद करत रौप्य आणि भारताच्या अॅन्सी सोजनने 6.39 मी. ची नोंद करत कांस्यपदक मिळविले.