हॉकी स्पर्धेत भारताला सुवर्ण, रौप्यपदक
वृत्तसंस्था, मस्कत
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे नुकत्याच झालेल्या उपकनिष्ठांच्या पुरुष आणि महिला फाईव्हज आशिया हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने सुवर्णपदक तर महिला संघाने रौप्यपदक पटकाविले. पुरुषांच्या विभागातील अंतिम सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. तर महिलांच्या विभागातील अंतिम सामन्यात चीनने भारताचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव करत सुवर्णपदक मिळविल्याने भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
पुरुषांच्या विभागातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. सामन्याच्या 5 व्या मिनिटाला रोमित पालने भारताचे खाते उघडले. कर्णधार केतन कुशावहने 12 व्या मिनिटाला तर शाहरुख अलीने 13 व्या मिनिटाला गोल नोंदवून पाकचे आव्हान 3-1 असे संपुष्टात आणले. पाकतर्फे एकमेव गोल मोहम्मद उस्मानने 16 व्या मिनिटाला नोंदविला. या सामन्यातील चारही गोल खेळाच्या पूर्वार्धात झाले. मात्र उत्तरार्धात उभय संघाकडून आक्रमक खेळ झाला. पण गोल नोंदविता आला नाही. या विजयामुळे भारतीय उपकनिष्ठ पुरुष हॉकी संघाने इलाईट पूलच्या गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले. आगामी होणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या युवा हॉकी फाईव्ज विश्वचषक स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ पात्र ठरले आहेत.
महिला संघाला रौप्यपदक
या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या उपकनिष्ठ महिलांच्या अंतिम सामन्यात बलाढ्या चीनने भारताचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीच्या लढतीत कझाकस्तानचा 8-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत हार पत्करल्याने भारतीय महिला हॉकी संघाला रौप्यपदक मिळाले. अंतिम सामन्यात पहिल्या मिनिटाला चीनचे खाते लूने मैदानी गोलवर उघडले. 5 व्या मिनिटाला किक्सेन तेंगने चीनचा दुसरा गोल केला. 7 व्या मिनिटाला ग्युओने चीनचा तिसरा गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत चीनने भारतावर 3-0 अशी आघाडी मिळविली होती. सामन्याच्या उत्तरार्धात नौशेन नाजने तसेच पुष्पा मांजीने भारतातर्फे गोल नोंदविले.
हॉकी इंडियाकडून बक्षिसाची घोषणा
या स्पर्धेतील दर्जेदार कामगिरीमुळे हॉकी इंडियाने सुवर्णपदक विजेत्या भारतीय कनिष्ठ पुरुषांच्या संघातील प्रत्येक खेळाडूला 2 लाख रुपयांचे बक्षीस तसेच या संघाच्या प्रशिक्षक वर्गातील प्रत्येक सदस्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच महिलांच्या विभागात रौप्यपदक मिळविणाऱ्या भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला 1 लाख रुपये तर प्रशिक्षक वर्गातील प्रत्येक सदस्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.