राष्ट्रकुल कनिष्ठ वेटलिफ्टिंगमध्ये भारताला चार सुवर्णपदके
सुनील सिंग, ऐसांगफा, अभिनव, चारू पेसी यांनी मिळविले यश
वृत्तसंस्था
आपिया, सामोआ : येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल युवा व कनिष्ठांच्या वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये तसेच वरिष्ठांच्या युनिव्हर्सल चषक स्पर्धेत दुसऱ्या दिवशी भारतीय वेटलिफ्टर्सनी प्रभावी कामगिरी करताना चार सुवर्णपदके पटकावली.
सुनील सिंगने पुरुषांच्या 65 किलो गटात एकूण 271 किलो (126 स्नॅच, 145 क्लीन-जर्क) वजन उचलत सुवर्ण पटकावले. महिलांच्या 58 किलो वजन गटात ऐसांगफा गोगोईने सुवर्ण आणि पुरुषांच्या 71 किलो वजन गटात अभिनव गोगोईने सुवर्ण मिळविले. ऐसांगफाने एकूण 185 किलो (79 स्नॅचमध्ये, 106 किलो क्लीन-जर्कमध्ये) वजन उचलत पहिले स्थान पटकावले. अभिनवने एकूण 284 (129+155) किलो वजन उचलले. युनिव्हर्सल कपमध्ये पुरुषांच्या 65 किलो वजन गटात अरुणाचल प्रदेशच्या चारू पेसीने सुवर्ण मिळविताना एकूण 289 (127+162) किलो वजन उचलले.
भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनचे अध्यक्ष सहदेव यादव यांनी विजेत्या खेळाडूंचे, प्रशिक्षक व साहाय्यक स्टाफच या कामगिरीबद्दल अभिनंदन केले. ‘या यशातून आपल्या खेळाडूंची आणि साहाय्यक स्टाफची कठोर मेहनत व कटिबद्धता दिसून येते. जागतिक वेटलिफ्टिंगच्या मंचावर भारत एक प्रबळ दावेदार म्हणून सातत्याने उदयाला येत आहे,’ असे त्यांनी आपल्या अभिनंदनाच्या संदेशात म्हटले आहे.