भारताला कंपाउंड तिरंदाजीत पाच पदके
मधुराला पहिले विश्वचषक सुवर्ण
वृत्तसंस्था/ शांघाय
तिरंदाजीतील विश्वचषक स्तर-2 मध्ये स्वप्नवत पुनरागमन करताना मधुरा धामणगावकरने तिचे पहिले वैयक्तिक विश्वचषक सुवर्णपदक जिंकले आणि शनिवारी कंपाउंड विभागात भारताने चमकदार कामगिरी करताना दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदकांची कमाई केली.
तीन वर्षांपासून बाजूला राहिल्यामुळे क्रमवारीत नसलेल्या मधुराने अंतिम फेरीत खळबळजनक सुधारणा केली. अमेरिकेच्या कार्सन क्रेहला 139-138 असे मागे टाकत तिने आपल्या अव्वल स्थानावर शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्रातील अमरावती येथील या 24 वर्षीय खेळाडूने त्यापूर्वी सांघिक रौप्य आणि मिश्र सांघिक कांस्यपदक जिंकले होते. त्यामुळे तीन पदके कमावून तिने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तथापि, मधुराचा वैयक्तिक अंतिम सामना हा चुरशीचा ठरला. एका टप्प्यावर ती 81-85 अशी मागे पडली होती. पण हार न मानता मधुराने धाडस दाखवले आणि 29 गुणांसह सामना 110-110 असा बरोबरीत आणला. त्यानंतर निर्णायक टप्प्यात मधुराने एका गुणाने विजय मिळवला.
त्यापूर्वी, भारताच्या पदकांची सुऊवात पुऊषांच्या सांघिक स्पर्धेत सुवर्णपदकाने झाली, जिथे अभिषेक वर्मा, ओजस देवताळे आणि ऋषभ यादव या त्रिकुटाने चुरशीच्या अंतिम फेरीत मेक्सिकोचा 232-228 असा पराभव केला. 22 वर्षीय यादवने कांस्यपदकासाठीच्या लढतीत दक्षिण कोरियाच्या किम जोंगोला नाट्यामय शूटऑफमध्ये पराभूत करून आपले पहिले वैयक्तिक विश्वचषक पदक जिंकले. महिला संघाच्या अंतिम फेरीत मधुराने ज्योती सुरेखा वेन्नम आणि चिकिथा तनिपार्थी यांच्यासोबत भागीदारी करून रौप्यपदक पटकावले. त्याशिवाय कमी गुणसंख्येच्या प्लेऑफमध्ये मलेशियाचा 144-142 असा पराभव करून मधुराने वर्मासोबत मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवले.
हे निकाल जागतिक स्तरावर कंपाउंड तिरंदाजीमध्ये भारताची वाढती ताकद आणि सातत्य अधोरेखित करतात. लॉस एंजेलिसमधील 2028 च्या ऑलिंपिकमध्ये मिश्र सांघिक गटात कंपाउंड तिरंदाजीचे ऑलिंपिक पदार्पण होणार असल्याने भारताचे लक्ष या खेळात पहिले ऑलिंपिक पदक मिळविण्यावर असेल.