यू-23 आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताला पाच पदके
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
व्हिएतनाममध्ये सुरु झालेल्या 23 वर्षाखालील वयोगटातील आशियाई चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत ग्रीको रोमन प्रकारात भारताच्या मल्लांनी पहिल्याच दिवशी 5 पदकांची कमाई केली.
या स्पर्धेत भारताच्या सुरज सिंग आणि सागर सिंग यांनी प्रत्येकी 1 रौप्यपदक पटकाविले. तर कुमार सचिन, रोहित आणि हरदीप यांनी आपल्या वजन गटातून प्रत्येकी 1 कांस्यपदक मिळविले. पुरुषांच्या 60 किलो वजन गटात भारताच्या सूरज सिंगने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. पण कझाकस्तानच्या अॅटबिकोव्हने सूरज सिंगचा 4-0 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक पटकाविल्याने सूरज सिंगला दुसऱ्या स्थानासह रौप्यपदक मिळाले.
पुरुषांच्या 67 किलो वजन गटात सागर सिंगने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. पण अंतिम फेरीत उझबेकच्या खेलमाकेनोव्हने सागर सिंगचा 9-0 असा पराभव करत सुवर्णपदक मिळविल्याने सागर सिंग रौप्यपदकाचा मानकरी ठरला. 77 किलो वजन गटात कुमार सचिनने कांस्यपदक घेतले. कझाकस्तानच्या डुरसुनोव्हने कुमार सचिनचा 10-3 असा पराभव केला. 97 किलो वजन गटात भारताच्या रोहितचे रौप्यपदक थोडक्यात हुकले. उझबेकच्या बॅरेनोव्हने रोहितचा 5-3 असा पराभव केल्याने रोहितला कांस्यपदक मिळाले. 130 किलो वजन गटात कझाकस्तानच्या युझारोव्हने भारताच्या हरदीपचा 4-0 असा पराभव केला. या पराभवामुळे हरदीप कांस्यपदकाचा मानकरी ठरला. भारताच्या विनीत आणि अमित गोपी यांचे अनुक्रमे 72 आणि 82 किलो वजन गटातील आव्हान पदकफेरी पूर्वीच समाप्त झाले. यापूर्वी झालेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत 23 आणि 17 वर्षाखालील वयोगटात भारताने 3 पदके मिळविली होती. त्यामध्ये सुमीतने 63 किलो गटात सुवर्ण तर अंकित गुलिया आणि नितीश यांनी कांस्यपदके घेतली होती. किर्झिस्तानमध्ये 2026 मध्ये झालेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने 5 पदके मिळविली होती. व्हिएतनाममधील स्पर्धेत आता रविवारी ग्रीकोरोमन प्रकारातील लढतींना प्रारंभ होणार असून 55 किलो गटात निरज, 63 किलो गटात सुमीत आणि 87 किलो गटात रोहित बुरा भारताचे प्रतिनिधीत्व करतील.