विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताला आठ पदके
सुरुची-सौरभ यांना मिश्र सांघिकमध्ये कांस्यपदक
वृत्तसंस्था/ ब्युनोस आयरिस (अर्जेंटिना)
नुकत्याच येथे झालेल्या 2025 च्या नेमबाजी हंगामातील पहिल्या आयएसएसएफ विश्वचषक रायफल, पिस्तुल आणि शॉटगन नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी दर्जेदार कामगिरी केली. भारतीय नेमबाजी संघाने या स्पर्धेत एकूण 8 पदकांची कमाई करत दुसरे स्थान पटकाविले. या स्पर्धेत चीनने 11 पदकांसह पहिले स्थान घेतले. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताच्या सुरुची आणि सौरभ यांनी 10 मी. एअर पिस्तुल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात कांस्यपदक मिळवताना आपल्या देशाच्या मनू भाकर आणि रविंद्र सिंग यांचा पराभव केला.
या स्पर्धेमध्ये भारतीय नेमबाजांनी 4 सुवर्णपदके, 2 रौप्य आणि 2 कांस्यपदके पटकाविली. चीनने 5 सुवर्ण, 3 रौप्य, आणि 3 कांस्य अशी एकूण 11 पदकांची कमाई करत अव्वल स्थान मिळविले. महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात सुरुची सिंग आणि सौरभ चौधरी यांनी भारताच्या मनू भाकर व रविंद्र सिंग यांचा 16-8 असा पराभव करत कांस्यपदक मिळविले. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मनू भाकरने 10 मी. एअर पिस्तुल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात सरबज्योत सिंग समवेत कांस्यपदक मिळविले होते. 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सौरभ चौधरी आणि सुरुची सिंग यांनी तिसरे स्थान मिळविले होते. ब्युनोस आयरिसमधील या स्पर्धेत महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल मिश्र सांघिक प्रकारात चीनच्या याओ क्युयानझुन आणि केई यांनी सुवर्णपदक तर चीनच्या मा क्विअँक आणि इफेन यांनी रौप्यपदक घेतले.
या स्पर्धेमध्ये भारताच्या रुद्रांक्ष पाटीलने पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत, महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत सुरुची सिंगने, विजयवीर सिधूने पुरुषांच्या 25 मी. रॅपिड फायर पिस्तुलमध्ये, महिलांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशन नेमबाजी प्रकारात सिफ्ट कौर समरा यांनी सुवर्णपदके मिळवली. ईशा सिंगने महिलांच्या 25 मी. पिस्तुल नेमबाजीत तसेच सौरभ बोरसे आणि रुद्रांक्ष पाटील यांनी 10 मी. एअर रायफल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात रौप्यपदके मिळवली. महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल मिश्र सांघिक प्रकारात सौरभ चौधरी आणि सुरुची सिंग तसेच पुरुषांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशन प्रकारात चेन सिंगने कांस्यपदक मिळविले. आता भारतीय नेमबाज पथक 15 एप्रिलपासून पेरुतील लिमा येथे सुरु होणाऱ्या आयएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात दाखल होणार आहे.