For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला 21 सुवर्णपदके

06:55 AM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला 21 सुवर्णपदके
Advertisement

दुसरी सर्वोत्तम कामगिरी :  अखेरच्या दिवशी क्रिकेट, गोल्फ, हॉकी, कुस्ती, तिरंदाजीत गोल्ड :

Advertisement

वृत्तसंस्था/ नागोया

आयची-नागोया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत 21 सुवर्णपदकासह एकूण 85 पदकांची कमाई केली. शनिवारी अखेरच्या दिवशी भारतीय खेळाडूंनी 5 सुवर्णपदके जिंकली.  शनिवारी तिरंदाजीत कुमकुम मोहोडने, कुस्तीमध्ये अमन सेहरावतने आणि गोल्फमध्ये प्रणवी उर्सने सुवर्णपदक जिंकले, तर भारताच्या पुरुष क्रिकेट संघाने आणि पुरुष हॉकी संघानेही सुवर्णपदक जिंकले. या दणकेबाज कामगिरीसह भारताने यंदाच्या स्पर्धेत 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्यपदकासह 85 पदके मिळवत चौथे स्थान पटकावले. अपेक्षेप्रमाणे चीनने 341 पदकासह पहिले, जपानने 269 पदकासह दुसरे तर द.कोरियाने 150 पदकासह तिसरे स्थान मिळवले.

Advertisement

महाराष्ट्रातील अमरावतीच्या कुमकुम मोहोडने शनिवारी भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. तिने महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक जिंकले. फायनलमध्ये दक्षिण कोरियाच्या ओ येजिनला 6-5 अशा फरकाने पराभूत केले. त्यामुळे ती आशियाई क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात पदक जिंकणारी पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. विशेष म्हणजे, कुमकुमने 2028 मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेचे आपले तिकीट पक्के केले. दरम्यान, यंदाच्या एशियन गेम्समधील स्पर्धेत कुमकुमचे हे दुसरे सुवर्णपदक आणि एकूण तिसरे पदक ठरले आहे. यापूर्वी तिने अंकिता भगत आणि किर्ती शर्मा यांच्यासोबत महिला रिकर्व्ह संघ स्पर्धेत सुवर्ण तर 2 ऑक्टोबर रोजी धीरज बोम्मदेवरा यांच्यासह मिक्स्ड रिकर्व्ह प्रकारात रौप्य पदक आपल्या नावावर केले होते.

तिरंदाजीत नीरज चौहानला कांस्य

तिरंदाजीमध्ये भारताला नीरज चौहानने कांस्यपदक मिळवून दिले. त्याने पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात कांस्य पदक जिंकले. त्याने भारताच्याच धीरज बोम्मादेवराला 6-4 अशा फरकाने पराभूत केले आणि कांस्यपदक जिंकले. त्यामुळे 16 वर्षांनंतर पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात भारताला पदक मिळाले.

कुस्तीत अमन सेहरावतला गोल्ड, अंतिम पंघालला रौप्य

पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात भारताच्या अमन सेहरावतने उत्तर कोरियाच्या वर्ल्ड चॅम्पियन चोंग सोंगचा अंतिम सामन्यात 11-7 अशा फरकाने पराभूत केले आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. अमनचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुसरे पदक ठरले. त्याने 2023 ला झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही याच प्रकारात कांस्य पदक जिंकले होते.

कुस्तीध्ये महिलांच्या 53 किलो वजनी गटात अंतिम पांघलने रौप्य पदक मिळवले. तिला अंतिम सामन्यात जपानच्या मो कियोकाकडून पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे सुवर्णपदक गमवावे लागले. विशेष म्हणजे, 53 किला गटात अंतिमकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती, पण तिला अखेरीस रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. याशिवाय, कुस्तीमध्येच दीपक पुनियाने पुरुषांच्या 97 किलो फ्रीस्टाइल गटात मंगोलियाच्या गंखुयाग गंबातर याला पराभूत करत कांस्य पदकाची कमाई केली.

गोल्फमध्ये इतिहास, 23 वर्षाच्या प्रणवी अर्सला सुवर्ण

भारतीय गोल्फर प्रणवी शरथ उर्सने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला गोल्फर ठरली आहे. म्हैसूरची 23 वर्षीय प्रणवीने अंतिम फेरीत इव्हन-पार 70 चा स्कोअर केला. तिसऱ्या होलवर ट्रिपल बोगीची निराशा झाल्यानंतर तिने दमदार पुनरागमन करत तीन बर्डीज नोंदवल्या. चार दिवसांच्या स्पर्धेनंतर तिचा एकूण स्कोअर 15-अंडर 265 इतका राहिला.

प्रणवीच्या या सुवर्णपदकासोबत भारतीय महिला गोल्फ संघानेही रौप्यपदक पटकावले. अदिती अशोकने अंतिम फेरीत 67, तर दीक्षा डागरने 77 चा स्कोअर केला. भारताने एकूण 14-अंडर 546 गुण मिळवले. चीनने 22-अंडर 538 गुणांसह सुवर्णपदकावर कब्जा केला. विशेष म्हणजे, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी गोल्फमधील सुवर्णपदकाचा इतिहास यापूर्वी शिव कपूरने 2002च्या बुसान आशियाई क्रीडा स्पर्धेत रचला होता. आता प्रणवीने महिला गोल्फमध्ये नवा इतिहास रचला आहे.

एशियन गेम्समध्ये चीनच अव्वल, भारताला चौथे स्थान

जपानमधील अयाची-नागोया येथे यंदाची आशियाई स्पर्धा पार पडली. तब्बल 46 देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे चायनाने वर्चस्व गाजवले. 169 सुवर्णपदकासह तब्बल 341 पदकांची कमाई करत चीनने पहिला क्रमांक पटकावला. यजमान जपानने 83 गोल्डसह 269 पदके जिंकत दुसरे तर द.कोरियाने 39 सुवर्णांसह 150 पदके जिंकत तिसरे स्थान पटकावले.

14 दिवसांच्या यशस्वी मोहिमेनंतर, भारतीय खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेत एकूण 85 पदकं जिंकली; यामध्ये 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे. या कामगिरीमुळे पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानावर राहिला. आशियाई क्रीडा स्पर्धेतील ही भारताची आतापर्यंतची दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. 2023 मध्ये भारताने 28 सुवर्णपदकांसह 106 पदके जिंकली होती.

Advertisement
Tags :

.