‘सुखोई बिझनेस जेट 100’ भारत करणार निर्मिती
हिंदुस्थान एरोनॉटिक्स आणि रशियाच्या युनायटेड एअरक्रॉफ्टमध्ये होणार करार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि रशिया संयुक्त विद्यमाने सुखाई बिझनेस सुपरजेट 100 अर्थात ‘एसबीजे 100’ ही प्रवासी वाहतूक विमाने तयार करणार आहे. या विमानांची निर्मिती भारतातच होणार आहे. भारताच्या सर्वात मोठ्या सिव्हिल एव्हिशन शो 2026 मध्ये याबाबत करार दृष्टीक्षेपामध्ये आला आहे. याकरता भारताची आघाडीची विमान निर्मिती कंपनी एचएएल अर्थात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि रशियाचे युनाटेड एअरक्रॉफ्ट कॉर्पोरेशन यांच्या याबाबतचा करार पूर्णत्वास गेला आहे. सुखोई सुपरजेट कंपनीचा हा बिझनेस आणि व्हिआयपी वाहतूक प्रकाराचा जेट प्रकल्प पहिल्यांदाच भारतीय विमान निर्मिती बाजारात उपलब्ध होणार आहे.
असे असेल एसबीजे 100
एसबीजे हा रशियाच्या सुखोई सुपरजेट विमानाचा लक्झरी बिझनेस जेट प्रकार आहे. हे सामान्य विमान नसून आकाशात विहरणारे व्हिआयापी ऑफिस आणि कॉन्फरन्स रुमने सज्ज असे कॉर्पोरेट ऑफिसच असणार आहे.
या विमानाची क्षमता 15 ते 19 प्रवासी असेल
मोठे आणि मल्टी झोन केबिन्स असतील
व्हियाआपी लाऊंज, मिटींग क्षेत्र, विश्रांती क्षेत्र आणि विशेष वॉशरुम सुविधा
दीर्घ पल्ल्यासाठी अत्यंत उपयुक्त
अत्याधुनिक एव्हिऑनिक्स, हायस्पीड क्रूझ क्षमता
भारताच्या वाढत्या कार्पोरेट जगतासाठी उपयुक्त
भारत सध्या जगाच्या बिझनेस हबच्या दिशेने वाटचाल करत आहे. कार्पोरेट प्रवास, सरकारी प्रतिनिधी मंडळांचा प्रवास आणि हाय एंड चार्टर फ्लाईटसची मागणी वाढू लागली आहे. अशावेळी एसबीजे 100 महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. इतर बिझनेस जेटसच्या तुलनेमध्ये एसबीजे अतिशय उपयुक्त आणि किफायतशीर पर्याय म्हणून पुढे येणार आहे. छोट्या बिझनेस जेट पेक्षा यामध्ये अधिक जागा आणि उपयुक्तता असल्याने एसबीजेची मागणी पुढील काळात वाढतच जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भारतातल्या वाढत्या कार्पोरेट जगताची मागणी पूर्ण होऊ शकते.
एचएएलबरोबर करार ?
विंग्ज इंडिया 2026मध्ये या कराराविषयी मोठी चर्चा आहे. एचएएलबरोबर हा करार होणार असल्याचेही सांगितले जात आहे. याशिवाय एचएएलमध्ये मेंटेनन्स, रिपेअर आणि ओव्हरहॉल, तांत्रिक सहाय्य, भविष्यातील औद्योगिक सहकार्य असे घटकही यामध्ये समाविष्ट केले जाणार असल्याचे याविषयी माहिती देणाऱ्या सुत्रांनी सांगितले. तसेच याबाबतच्या कराराला अंतिम स्वरुप दिले जात असून त्याविषयीच्या चर्चा शेवटच्या टप्प्यात आहेत.
भारत दीर्घकालिन भागिदार
रशियाला या करारातून केवळ बाजारपेठ म्हणून भारताकडे बघयाचे नाही तर भारताला दीर्घकालिन विमान व्यवसायातील भागिदार म्हणून महत्त्व देण्याचे धोरण असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर हा करार म्हणजे भारतासाठी मोठे जागतिक व्यासपिठ ठरणार आहे. भारत स्वत:बरोबर अन्य देशांशीही या विमानांच्या विक्रीबाबत स्वतंत्र करार करु शकणार आहे. भारतातील विमान उद्योगही या करारामुळे बहरात येण्याचीही शक्यता अर्थतज्ञ आणि बाजारपेठेतील महत्त्वाचे उद्योजक व्यक्त करत आहेत. भारत यामुळे विमान उद्योगामध्येही ‘आत्मनिर्भर’ होण्याच्या दिशेने वाटचाल करु शकणार आहे. भारताच्या विमान निर्मिती आणि व्हिआयपी एव्हिशन क्षेत्रासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. पुढील एक वर्षाच्या कालावधीमध्ये अशी 10 विमाने भारतात येऊ शकतील. तर त्यापुढील तीन वर्षात सेमी नॉकआऊट सुपरजेट 100 तयार करणे हे एचएएलचे लक्ष्य असेल. या क्षेणीतील सुमारे 200 विमानांची भारताला गरज भासेल, असा अंदाज आहे. त्यादृष्टीने हा करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे.