For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताला मिळणार आयरन डोम कवच

06:30 AM Feb 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारताला मिळणार आयरन डोम कवच
Advertisement

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी इस्रायलची मोठी घोषणा : तंत्रज्ञान हस्तांतरणाची दाखविली तयारी

Advertisement

वृत्तसंस्था/ तेल अवीव

हमास, हिजबुल्ला आणि इराणविरोधी युद्धात इस्रायलसाठी ढाल ठरलेली आयरन डोम एअर डिफेन्स सिस्टीम आता भारताला मिळू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी इस्रायलच्या दौऱ्यावर जाणार असून यादरम्यान दोन्ही देशांदरम्यान अब्जावधी डॉलर्सचे संरक्षण करार होणार आहेत. यात क्षेपणास्त्र, एआय तंत्रज्ञान, ड्रोन्सपासून हवाई सुरक्षा यंत्रणेची खरेदी सामील असेल. याचदरम्यान इस्रायलने भारताला आयरन डोम एअर डिफेन्स सिस्टीमचे तंत्रज्ञान हस्तांतरण करण्याची ऑफर दिली आहे. आयरन डोमच्या यशाचा दर जवळपास 90 टक्के आहे. रॉकेट, क्षेपणास्त्र आणि ड्रोनविरोधात ही प्रणाली अत्यंत उपयुक्त आहे. चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या धोक्यादरम्यान ही प्रणाली भारतासाठी मोठे कवच ठरू शकते.

Advertisement

इस्रायल भारतासोबत स्वत:च्या द्विक्षीय संरक्षण कराराला वाढविण्याची योजना आखत असून याच्या माध्यमातून तंत्रज्ञान हस्तांतरण केले जाणार आहे तसेच भारतात सैन्य हार्डवेअर निर्माण करता येणार आहे. याचबरोबर अत्याधुनिक आयरन डोम आणि अन्य हवाई सुरक्षा यंत्रणांमध्येही सहकार्य वाढविले जाऊ शकेल. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावरून आम्ही अत्यंत उत्सुक आहोत असे उद्गार भारतातील इस्रायलचे महावाणिज्यदूत यानिव रेवाच यांनी काढले आहेत.

नव्या आघाडीचे प्रयत्न

भारतीय उपखंडातील संवेदनशीलता आम्ही समजतो आणि याचमुळे आम्ही भारत आणि अब्राहम करारात सामील देश तसेच काही आफ्रिकन देशांसोबत मिळून एक वेगळी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. याच्या माध्यमातून कट्टरवादाला हाताळले जाणार आहे.  पंतप्रधान मोदी या पुढाकाराला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा असल्याचे रेवाच म्हणाले.

धार्मिक कट्टरवादाचे आव्हान

दोन्ही देशांदरम्यान संरक्षण सहकार्य सातत्याने वाढत आहे. भारत आणि इस्रायल दोघेही आव्हानांना सामोरे जात आहेत. भारतात उत्पादन, संरक्षण सहकार्य आणि भारतासोबत तंत्रज्ञान हस्तांतर करण्याची योजना आखली जात आहे.  आमच्यासमोर धार्मिक कट्टरवादाचे आव्हान असल्याने याच्या विरोधातील सहकार्य वृद्धींगत केले जाणार असल्याचे रेवाच यांनी नमूद पेले आहे.

आयरन डोमची क्षमता

इस्रायलचे आयरन डोम एक मोबाइल एअर डिफेन्स सिस्टीम आहे. इस्रायलची कंपनी राफाएल अॅडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टीम आणि इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीजने मिळून ही प्रणाली विकसित केली आहे. कमी पल्ल्याचे रॉकेट, क्षेपणास्त्र आणि ड्रोन आकाशातच नष्ट करण्यासाठी ही प्रणाली निर्माण करण्यात आली आहे. या प्रणालीचा यशाचा दर 90 टक्के असल्याचा इस्रायलचा दावा आहे. ही प्रणाली रडारचा वापर स्वत:च्या शत्रूंची ओळख पटविण्यासाठी करते. त्यानंतर ती शत्रूच्या हवाई यानांच्या दिशेने तमीर इंटरसेप्टर क्षेपणास्त्रs डागते.

आयरन डोम तुलनेत महाग

आयरन डोमच्या प्रत्येक बॅटरीत एक रडार, एक बॅटलर मॅनेजमेंट कंट्रोल सेंटर आणि लाँचर असतो. ज्यात कमीतकमी 20 तमीर इंटरसेप्टर क्षेपणास्त्रs असतात. ही प्रणाली प्रत्येक हवाई हल्लेखोराची ओळख पटविते आणि हल्लेखोर यान लोकवस्ती नसलेल्या भागाच्या दिशेने जात असेल तर त्याला नष्ट करत नाही.  ही प्रणाली कमी उंचीपर्यंत पोहोचणारे तोफगोळे, मोर्टार आणि रॉकेट विरोधात अत्यंत उपयुक्त आहे. आयरन डोम प्रभावी असले तरी हे अत्यंत महाग आहे. एका तमीर इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची किंमत 40-50 हजार डॉलर्स असते. तर आयरन डोमच्या बॅटरीची किंमत 10 कोटी डॉलर्सपर्यंत असू शकते.

Advertisement

.