उपांत्य फेरीत आज भारताचा मुकाबला ऑस्ट्रेलियाशी
विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढण्याची संधी, दुबईतील खेळपट्टीचे स्वरुप व फिरकी गोलंदाजांवर राहील
वृत्तसंस्था/ दुबई
दुबई येथे आज मंगळवारी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारत व ऑस्ट्रेलिया यांच्या रुपाने दोन बलाढ्या क्रिकेट शक्ती एकमेकांशी भिडतील. अलीकडचा इतिहास जरी ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकणारा असला, तरी भारताचा भर त्यांचा फिरकी मारा व येथील परिचयाची परिस्थिती यावर असेल. तथापि, हे सोपे काम नाही, कारण पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिशेल स्टार्क या प्रमुख खेळाडूंविना असूनही ऑस्ट्रेलिया हा मजबूत संघ आहे. काही दिवसांपूर्वी लाहोर येथे इंग्लंडविऊद्ध त्यांनी 352 धावांचा यशस्वीरीत्या केलेला जबरदस्त पाठलाग ही बाब दाखवून देतो.
2011 च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाविऊद्ध शेवटचा विजय मिळवला होता. 2015 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आणि 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या जेतेपदाच्या लढतीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. त्याशिवाय 2023 मध्ये झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतही त्यांना पराभव पत्करावा लागला. गेल्या 14 वर्षांपासूनचे हे चित्र यावेळी बदलून दाखविण्याची भारतीय संघाला खरोखरच आशा आहे आणि त्या आशावादाचे मुख्य कारण यावेळी संघात असलेली काही अव्वल फिरकी गोलंदाजांची उपस्थिती हे आहे.
स्पर्धेपूर्वी पाच फिरकी गोलंदाज समाविष्ट करण्याच्या भारताच्या निर्णयावर सर्वत्र टीका झाली होती, परंतु आता दुबईतील संथ खेळपट्ट्यांवर हा एक मास्टरस्ट्रोक असल्याचे सिद्ध होत आहे. सर्व सामने दुबईमध्ये खेळण्याची संधी मिळाल्यामुळे येथील परिस्थितीशी चांगलेच परिचित होऊन भारताला वर्चस्व गाजविता आले आहे असे स्पष्टीकरण दिले जात असले, तरी ते अंशत: खरे आहे. येथील खेळपट्टीच्या गरजेनुसार त्यांनी बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. येथे चेंडू वेगाने किंवा खूप वळत नसल्याने भारतीय फिरकी गोलंदाजांना ‘वेटिंग गेम’ खेळणे भाग पडले आहे. या खेळपट्टीवर गोलंदाजी करताना संयम हा महत्त्वाचा घटक आहे, असे वऊण चक्रवर्तीने म्हटले आहे.
चक्रवर्ती, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या भारतीय फिरकी गोलंदाजांनी न्यूझीलंडचे नऊ बळी मिळविले. त्यांनी सातत्याने दबावाचा वापर केला, ज्याचे बक्षीस त्यांना मिळाले. त्यांनी टाकलेल्या 39 षटकांमध्ये 128 निर्धाव चेंडू राहून किवी संघाला कोंडीतून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करावा लागला आणि त्यात त्यांचे फलंदाज बाद होण्यास सुरुवात झाली. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाकडे अॅडम झॅम्पा हा एकमेव अस्सल फिरकी गोलंदाज असून कामचलावू फिरकी टाकणारा ग्लेन मॅक्सवेल आणि ट्रॅव्हिस हेड यांच्याकडूनही चांगली कामगिरी होईल अशी त्यांना आशा असेल.
मॅथ्यू शॉर्टला पायाच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियाला फिरकी गोलंदाजीचा एक पर्याय गमवावा लागला आहे. त्यांच्या मागील सामन्यांमध्ये आघाडीच्या नावांची अनुपस्थिती जाणवलेली आहे. कारण जरी फलंदाजीस पोषक परिस्थिती राहिली असली, तरी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी इंग्लंड आणि अफगाणिस्तानविऊद्ध अनुक्रमे 352 आणि 273 धावा दिल्या. त्यामुळे विराट कोहली, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलसारखे खेळाडू येथे त्यांच्याविरुद्ध पूर्ण जोर लावण्यास उत्सुक असतील. त्यांना या संथ खेळपट्ट्यांवर फलंदाजीची लय सापडली आहे.
ऑस्ट्रेलियाने हेड आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांचे कोणतेही अर्थपूर्ण योगदान लाभलेले नसताना देखील 350 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठून दाखविलेले आहे. त्यामुळे त्यांच्या फलंदाजीच्या क्षमतेबद्दल भारताला सतर्क राहावे लागेल. भारत त्यांना आणि विशेषत: हेडला लवकरात लवकर गुंडाळण्याचे लक्ष्य समोर ठेवेल. कारण हेड हा अलीकडच्या काळात संघाला वारंरवार महागात पडला आहे. 2023 मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून स्वीकाराव्या लागेल्या पराभवाचे दु:ख कमी करण्याची ही रोहित आणि त्याच्या संघासाठी एक संधी आहे.
संघ-भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वऊण चक्रवर्ती.
ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅलेक्स केरी, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, अॅडम झॅम्पा, कूपर कॉनोली.
सामन्याची वेळ : दुपारी 2.30 वा.
दोन्ही संघांवर राहील दबाव : रोहित शर्मा
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविऊद्ध भारतावर अतिरिक्त दबाव राहण्याची शक्यता कर्णधार रोहित शर्माने फेटाळून लावली असून दोन्ही संघांवर जिंकण्यासाठीचा दबाव समान प्रमाणात राहील, असे मत व्यक्त केले आहे. ‘ते एक मजबूत प्रतिस्पर्धी आहेत. पण आम्हाला मागील तीन सामन्यांच्या वेळी आम्ही कसा विचार केला ते लक्षात घ्यावे लागेल आणि या सामन्याकडे त्याच पद्धतीने पाहावे लागेल. आम्हाला प्रतिस्पर्धी संघ आणि ते कसे खेळतात हे चांगलेच माहीत आहे’, असे रोहितने सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.