भारत रशियाकडील तेलखरेदी वर्षअखेरपर्यंत पूर्णपणे थांबवेल!
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा दावा
वृत्तसंस्था/ क्वालालंपूर
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताने रशियन तेल खरेदी कमी करण्यास सुरुवात केल्याचा दावा केला आहे. रशिया तेल विकून युक्रेनमध्ये युद्ध छेडत असल्याने अमेरिकेने रशियाच्या रोझनेफ्ट आणि लुकोइल या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत, असेही ते पुढे म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांची ही घोषणा दक्षिण कोरियामध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी होणाऱ्या बैठकीपूर्वी आली आहे. एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले आहे. रशियाकडून तेल आयात कमी करण्यासंबंधीच्या ट्रम्प यांच्या दाव्याला भारताने सातत्याने नकार दिला आहे. भारताने आपली प्राथमिकता राष्ट्रीय हितांचे रक्षण करणे ही असल्याचे वेळोवेळी सांगितले आहे.
अमेरिकेने रशियाचे तेल खरेदी करणाऱ्या भारतावर अतिरिक्त 25 टक्के कर लादल्यामुळे भारतावरील एकूण अमेरिकन कर 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. व्यापार, तंत्रज्ञान आणि कच्च्या मालाच्या निर्बंधांवरून अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचा आशिया दौरा सुरू झाला आहे. चालू व्यापार युद्ध थांबवू शकेल अशा करारावर पोहोचण्यासाठी दोन्ही देशांवर दबाव वाढत आहे. पत्रकारांनी शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या भेटीत ट्रम्प रशियाकडून चीनच्या तेल खरेदीचा उल्लेख करतील का असे विचारले असता, अमेरिकन नेत्यांनी होकारार्थी उत्तर दिले. त्याचवेळी त्यांनी भारत पूर्णपणे कपात करण्याच्या विचारात असून आम्ही निर्बंध देखील लादले आहेत, असा दावा ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांच्या मते, त्यांच्या आशिया दौऱ्याचा उद्देश केवळ व्यापार मुद्यांवर चीनशी करार करणे नाही तर फेंटानिल मुद्यावर चर्चा करणे हेदेखील आहे.
ट्रम्प यांचे दावे भारताने फेटाळले
भारताने ट्रम्प यांचे दावे वारंवार नाकारले आहेत. रशियन तेल खरेदी करण्याचा भारताचा निर्णय राष्ट्रीय हितावर आधारित असल्याने कोणत्याही बाह्य दबावामुळे प्रभावित होत नसल्याचे परराष्ट्र विभागाने म्हटले आहे. रशियाकडून स्वस्त कच्चे तेल खरेदी करणे हे त्यांच्या ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक स्थिरतेसाठी आवश्यक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच भारताबद्दल यापूर्वी दोनवेळा असाच दावा केला आहे.