भारत तिसरी अर्थव्यवस्था होणार
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी 2027 साठी व्यक्त केला दावा
नवी दिल्ली :
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले की, 2027 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, म्हणजेच जीडीपीच्या बाबतीत भारत पाचव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर जाईल. पियुष गोयल यांनी ‘तुघलक’ या तमिळ मासिकाच्या वार्षिक सभेला संबोधित करताना म्हटले की, 2027 पर्यंत भारत जपान आणि जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे.
10 वर्षात काय केले?
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षांत काय केले? त्यांनी भारताला 11 व्या क्रमांकाच्या जीडीपीवरून पाचव्या क्रमांकाच्या जीडीपीवर आणले. काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी 2014 मध्ये भाकीत केले होते की, भारत 30 वर्षांत तिसरा सर्वात मोठा जीडीपी देश बनेल. मात्र पंतप्रधान मोदी म्हणाले की मी ते अर्ध्यापेक्षा कमी वेळेत करेन आणि मला विश्वास आहे की, 2027 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असेही मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केले आहे.
जपान, जर्मनीच्या पुढे राहणार भारत
पियुष गोयल म्हणाले की भारत लवकरच जपान आणि जर्मनीला मागे टाकेल. ते म्हणाले की आपण जपान आणि जर्मनीच्या पुढे असू. फक्त 13 वर्षांत, 30 वर्षांत नाही. ही पंतप्रधान मोदींची वचनबद्धता आणि दृढ विश्वास आहे. भारत सध्या पाचव्या स्थानावर आहे.