For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत होणार आर्थिक महासत्ता

06:14 AM Feb 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत होणार आर्थिक महासत्ता
Advertisement

‘सेवा तीर्थ’ येथील प्रथम मंत्रिमंडळ बैठकीत निर्धार

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे कार्यालय ‘सेवा तीर्थ’ येथे पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारताला लवकरात लवकर जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत या बैठकीचे आयोजन करण्यात आले. भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनविण्यासंबंधीचा प्रस्ताव या बैठकीत संमत करण्यात आला. इतरही अनेक महत्वाचे निर्णय घेतले गेले आहेत.

Advertisement

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाची प्रत्येक बैठक साऊथ ब्लॉक येथे घेतली गेली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी नवे अत्याधुनिक कार्यालय निर्माण करण्यात आले आहे. या कार्यालयातील ही प्रथमच बैठक होती. या नूतन वास्तूच्या माध्यमातून भारताची आर्थिक उन्नती अधिक वेगाने होणार असून भारत एक आर्थिक महासत्ता होणार आहे. ही वास्तू भारताच्या या प्रगतीची साक्षीदार ठरणार आहे, असे प्रतिपादन करण्यात आले.

केवळ कार्यालय नव्हे, तर तीर्थस्थळ

देशासाठी केवळ यांत्रिकपणाने कार्य करणारे हे कार्यालय नसून त्याचे महत्व एखाद्या तीर्थस्थळासारखे आहे. भारताच्या राज्यघटनेला अनुसरुन निर्णय घेणे आणि भारतीय जनतेच्या आशाआकांक्षांना न्याय देतील असे धोरण निर्धारित करणे, या ध्येयांसाठी या नव्या वास्तूचा उपयोग केला जाईल, असा निर्धारही करण्यात आला.

नागरीक देवो भव

ही नवी वास्तू केवळ आणि केवळ 140 कोटी भारतीयांच्या हिताचाच विचार करणार आहे. येथे होणारा प्रत्येक निर्णय भारताला नव्या उंचीवर घेऊन जाणारा आणि प्रत्येक भारतीयाच्या जीवनात नवा प्रकाश आणणारा असेल. या वास्तूचे पावित्र्य जनोपयोगी धोरणे निर्धारित करुन संरक्षित केले जाईल. ‘नागरीक देवो भव’ या तत्वाचे आचरण या वास्तूत केले जाईल. देशाचे प्रशासन पारदर्शी, सकारात्मक, उत्तरदायी आणि संवेदनशील असण्याची सुनिश्चिती या वास्तूत केली जाईल, अशा आशयाचा प्रस्ताव या मंत्रिमंडळाच्या प्रथम बैठकीत संमत करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.