अवकाश क्षेत्रात भारत ‘शक्तिमान’ होणार
इस्रो तामिळनाडूत नवीन प्रक्षेपण तळ उभारणार : मोहिमांना गती मिळणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (इस्रो) नावलौकिक केवळ भारतातच नाही तर जगभरात पसरलेला आहे. अनेक यशस्वी मोहिमांमुळे भारत अवकाश क्षेत्रात अनेक देशांसाठी मदतगार ठरलेला आहे. अवकाश क्षेत्रातील देशव्यापी मोहिमा आणि संशोधनाला नवे पंख मिळत असतानाच आता भारताने व्याप्ती वाढवण्याचा विचार केला आहे. त्यादृष्टीने आता इस्रो नवा प्रक्षेपण तळ उभारणार असून भारतीय अवकाश क्षेत्र ‘शक्तिमान’ होईल, असा दावा केला जात आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा मुख्य उपग्रह प्रक्षेपण तळ आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात आहे. येथून भारताने आतापर्यंत अनेक ऐतिहासिक मोहिमा सुरू केल्या आहेत. पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही सारख्या रॉकेटच्या मदतीने या केंद्रातून देश आणि जगातील अनेक उपग्रह अवकाशात पाठवण्यात आले आहेत. मात्र, आता तामिळनाडूमध्ये एक नवीन लाँच पॅड बांधले जाईल. वेगाने वाढणाऱ्या अंतराळ मोहिमांमुळे, इस्रो आता त्यांचे दुसरे लाँच पॅड उभारण्याचे काम करत आहे. हे नवीन लाँच पॅड तामिळनाडूतील थुथुकुडी जिह्यातील कुलशेखरपट्टिनम येथे बांधण्याची योजना आहे. यामुळे इस्रोची प्रक्षेपण क्षमता वाढेल आणि अंतराळ मोहिमा अधिक जलद आणि सहजपणे पूर्ण होतील.
जमीन अधिग्रहण पूर्ण
कुलशेखरपट्टिनम येथे रॉकेट लाँचपॅडच्या बांधकामासाठी 2,233 एकर जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी केली होती. यानंतर, इस्रोने येथे रोहिणी रॉकेटच्या प्रक्षेपणाची घोषणा केली.
पहिल्या यशस्वी प्रक्षेपणाचा ऐतिहासिक क्षण
लाँचपॅडची पायाभरणी केल्यानंतर लगेचच, रोहिणी 6एच200 लहान रॉकेट कुलशेखरपट्टणम येथून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. या मोहिमेद्वारे पहिले वातावरणीय सर्वेक्षण करण्यात आले. इस्रोच्या योजनेनुसार, रॉकेट 75.24 किमी उंचीवर पोहोचले आणि 121.42 किमी अंतर कापल्यानंतर समुद्रात पडले.
रॉकेट लाँचपॅडच्या बांधकामाला सुरुवात
आज या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत कुलशेखरपट्टिनममध्ये रॉकेट लाँचपॅडचे बांधकाम सुरू झाले आहे. यावेळी सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ राजाराजन आणि इतर इस्रो शास्त्रज्ञांनी भूमिपूजन केले. या लाँचपॅडसोबतच त्याचठिकाणी इस्रोची एक विशेष सेवा इमारत आणि लाँच कॉम्प्लेक्स देखील बांधले जाईल. या नवीन लाँचपॅडच्या बांधकामामुळे इस्रोला अधिक स्वातंत्र्य मिळेल आणि लाँचचा वेग वाढेल.