For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचा झिम्बाब्वेला ‘व्हाईटवॉश’

06:55 AM Jul 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारताचा झिम्बाब्वेला ‘व्हाईटवॉश’
Advertisement

तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडिया 35 धावांनी विजयी : वैभव सूर्यवंशी सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराचा मानकरी

Advertisement

वृत्तसंस्था

हरारे

Advertisement

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टी-20 मालिकेत झिम्बाब्वेला 3-0 असा क्लीन स्वीप दिला आहे. रविवारी झालेल्या तिसऱ्या व शेवटच्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर 35 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 5 बाद 192 धावा केल्या. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला 7 बाद 157 धावा करता आल्या. विशेष म्हणजे, श्रेयस अय्यरचा कर्णधार म्हणून पहिलाच मालिकाविजय ठरला आहे. तसेच युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

प्रारंभी, श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. अभिषेक शर्मा अवघ्या 2 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर ईशान किशन आणि वैभव सूर्यवंशीने भारतीय संघाचा डाव सावरला. ईशानने 29 धावांचे योगदान दिले. तर श्रेयस अय्यरने 27 धावा केल्या. दुसरीकडे, वैभव सूर्यवंशीकडे शतक झळकावण्याची सुवर्णसंधी होती, पण तो 81 धावा करुन माघारी परतला. त्याने 49 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारासह 81 धावांचे योगदान दिले. याशिवाय, तिलक वर्मा 11 धावांवर नाबाद राहिला. रिंकू सिंगने 25 धावा फटकावल्या. या जोरावर भारतीय संघाने 20 षटकांत 5 बाद 192 धावा केल्या.

193 धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने पहिल्याच चेंडूवर आपली विकेट गमावली. मयंक यादवने ब्रायन बेनेटला बाद केले. त्यानंतर यश ठाकूरने डिऑन मायर्स आणि सिकंदर रझा यांना झटपट बाद करून यजमान संघाला बॅकफूटवर ढकलले. रेयान बर्लने सर्वाधिक 43 चेंडूत 54 धावा केल्या, पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. माधवेरेने 28 धावांचे योगदान दिले. इव्हान्सला 14 धावा करता आल्या. झिम्बाब्वेला निर्धारित 20 षटकांत 157 धावापर्यंतच मजल मारता आली. हा सामना त्यांनी 35 धावांनी गमावला. भारताकडून मयांक यादवने सर्वाधिक 3 बळी घेतले. यश ठाकूरने 2 बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

भारत 20 षटकांत 5 बाद 192 (वैभव सूर्यवंशी 49 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारासह 81, अभिषेक शर्मा 2, ईशान किशन 29, श्रेयस अय्यर 27, तिलक वर्मा नाबाद 11, रिंकू सिंग 25, इव्हान्स 2 बळी, सिकंदर रझा, मुझरबानी आणि माधवेरे प्रत्येकी 1 बळी)

झिम्बाब्वे 20 षटकांत 7 बाद 157 (बेन करन 20, मायर्स 19, रेयान बर्ल नाबाद 54, इव्हान्स 14, मयांक यादव 3 बळी, यश ठाकूर 2 बळी, अशोक शर्मा आणि रवि बिष्णोई प्रत्येकी 1 बळी).

वैभवचा आणखी एक धमाका

15 वर्षीय वैभवने झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यात 81 धावांची खेळी साकारली. या खेळीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कोणत्याही फॉरमॅटमध्ये) वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी दोन अर्धशतके झळकावणारा तो जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला असून त्याने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. झिम्बाब्वे टी 20 मालिकेत त्याने पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी साकारली.  यापूर्वी नेपाळचा फलंदाज कुशल मल्लाने 15 व्या वर्षी एकदा एकदिवसीय  क्रिकेटमध्ये अर्धशतक केले होते, परंतु वैभवने आता त्याच वयात ही कामगिरी दोनदा करून दाखवली आहे. विशेष म्हणजे, क्रिकेटच्या इतिहासात, कमी वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन अर्धशतके झळकावणारा वैभव हा जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे.

Advertisement
Tags :

.