इंदूरमध्ये आज भारत - वेस्ट इंडिज तिसरा टी-20 सामना
पुन्हा एकदा फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळण्याची शक्यता
वृत्तसंस्था, इंदूर : आज रविवारी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे. हे मैदान फलंदाजीसाठी अत्यंत अनुकूल मानले जाते, त्यामुळे गोलंदाजांवर पुन्हा एकदा मोठा दबाव येण्याची शक्यता आहे. कारण त्यांना या मालिकेत आधीच खूप मार सहन करावा लागला आहे.
रांची येथील दुसऱ्या टी-20 सामन्यात एकूण 501 धावा झाल्या. त्यात वेस्ट इंडिजने भारताचे 250 धावांचे प्रचंड आव्हान एका षटकापेक्षा जास्त चेंडू शिल्लक असतानाच पूर्ण केले. या घटनेमुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना पंधरवड्यात दुसऱ्यांदा गोलंदाजांच्या दयनीय स्थितीकडे लक्ष द्यावे लागले आहे. मात्र, गंभीर यांची रणनीती आखणारी टीम आणि त्यांचे गोलंदाज तसेच प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाज यांना इंदूरमध्ये तरी त्वरित दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण येथील पाटा खेळपट्टी आणि लहान सीमारेषा नेहमी फलंदाजांनाच साथ देतात.
त्यामुळे दोन्ही संघांसाठी ते विविध आघाड्यांवर (फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण) आपली योजना कशा प्रकारे अंमलात आणतात हे महत्त्वाचे ठरेल; विशेषत: झेल सोडणे किंवा संधी गमावणे या गोष्टींचे परिणाम गंभीर ठरू शकतात. वेस्ट इंडिजच्या डावाच्या मध्यास मयंक यादवने शेरफेन रदरफोर्डचा एक सोपा झेल सोडला होता, जो निर्णायक ठरला. कारण त्यानंतर रदरफोर्डने कर्णधार शाई होपसोबत 54 चेंडूंत 120 धावांची मोठी भागीदारी केली.
भारताला वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपच्या फलंदाजीबद्दलही सावध राहावे लागेल. कारण या दौऱ्यावर त्याने दोन शतके झळकावली आहेत. भारतासाठी गोलंदाजीच्या बाबतीत उपाय शोधणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे ही पुन्हा एकदा एक मोठी परीक्षा असेल. तसेच या सामन्यात दव पडण्याची शक्यता असल्याने त्याचाही खेळावर परिणाम होऊ शकतो. या मालिकेत भारतासाठी एक सकारात्मक बाब म्हणजे कर्णधार श्रेयस अय्यरने पुन्हा एकदा आपला फॉर्म मिळवला आहे. संजू सॅमसनने 41 चेंडूंमध्ये 82 धावांची खेळी करत आपल्या खराब फॉर्मला पूर्णविराम दिला. यामुळे वैभव सूर्यवंशीला संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते, कारण रांचीमधील सामन्यानंतर गंभीरने पुन्हा एकदा मधल्या फळीतील लवचिकतेचे महत्त्व अधोरेखित केले, मात्र वरच्या फळीत तसे करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले.
भारताला आपला प्रमुख गोलंदाज अर्शदीप सिंगकडून नक्कीच अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. त्याने दोन सामन्यांत 79 धावा दिल्या आहेत आणि त्याबदल्यात त्याला केवळ एकच बळी मिळाला आहे. मयांकने अतिवेगवान गोलंदाजी करत सुऊवातीला दोन आणि एकूण तीन बळी मिळवले. भारताला अपेक्षा असेल की, हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज अशीच कामगिरी पुढेही चालू ठेवेल.
संघ-भारत : श्रेयस अय्यर (कर्णधार), इशान किशन, संजू सॅमसन, नमन धीर, वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रे•ाr, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, प्रिन्स यादव, रवी बिश्नोई, मयंक यादव.
वेस्ट इंडिज : शाई होप (कर्णधार), ज्वेल अँड्य्रू, शिमरॉन हेटमायर, अमीर जांगू, कामिल पूरन, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, रोस्टन चेस, कीमो पॉल, रोमॅरियो शेफर्ड, शमर स्प्रिंगर, मॅथ्यू फोर्ड, अकील होसेन, शामर जोसेफ, गुडाकेश मोती.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7 वा.
