ऑकलंडमध्ये चेस मास्टरचा क्लास! विराट कोहलीच्या झंझावाताने भारताचा विजय; न्यूझीलंडवर 5 विकेट्सनी मात
कोहली-गिलची शतकी भागीदारी
143 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. रोहित शर्मा खाते न उघडताच बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. गिलने 56 चेंडूंमध्ये 5 चौकारांच्या मदतीने 37 धावा केल्या, तर कोहलीने 51 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 1 षटकार लगावत 74 धावांची शानदार खेळी केली.
कोहलीने या सामन्यात वनडे कारकिर्दीतील 80 वे अर्धशतक पूर्ण केले. तसेच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना वनडे क्रिकेटमध्ये 13 हजार धावांचा टप्पा पार करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. कोहलीच्या या विक्रमी कामगिरीने त्याच्या फलंदाजीतील सातत्य पुन्हा अधोरेखित केले.
कोहली बाद झाल्यानंतर भारताने अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर यांचे विकेट्स गमावले. अक्षरला खाते उघडता आले नाही, तर श्रेयसने 15 धावा केल्या. अखेरीस केएल राहुल 3 आणि नमन धीर 5 धावांवर नाबाद राहिले. भारताने 22.4 षटकांत लक्ष्य गाठत शानदार विजय नोंदवला.
अर्शदीप, गुरनूरची गोलंदाजीत चमक
तत्पूर्वी टॉस गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडचा डाव 40.2 षटकांत 185 धावांवर आटोपला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच किवी फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. अर्शदीप सिंहने 4 विकेट्स घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीला मोठे धक्के दिले, तर गुरनूर बरारने 3 विकेट्स मिळवत प्रभावी कामगिरी केली. अंशुल कंबोजनेही 2 विकेट्स घेतल्या.
न्यूझीलंडकडून टिम सायफर्टने 38, डॅरिल मिचेलने 28 आणि ग्लेन फिलिप्सने 30 धावांचे योगदान दिले. मात्र, अखेरच्या टप्प्यात ब्लेअर टिकनरने आक्रमक फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांना आव्हान दिले. त्याने 23 चेंडूंमध्ये 4 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 34 धावा केल्या. जेकब डफीसोबत त्याने 10 व्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. टिकनरला गुरनूर बरारने बाद करत न्यूझीलंडचा डाव संपवला.
पुढील सामना 7 नोव्हेंबरला
पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याचा कालावधी आणि लक्ष्य दोनदा बदलण्यात आले. अखेर डीएलएस नियमानुसार भारताला 32 षटकांत 143 धावांचे लक्ष्य मिळाले. भारतीय फलंदाजांनी आक्रमक खेळ करत हे लक्ष्य सहज गाठले.
या विजयामुळे भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. मालिकेतील दुसरा वनडे सामना 7 नोव्हेंबर रोजी वेलिंग्टन येथे खेळवण्यात येणार आहे. विराट कोहलीची शानदार फलंदाजी आणि भारतीय गोलंदाजांची प्रभावी कामगिरी यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे.
