भारत-मलेशिया आज चुरशीची लढत
वृत्तसंस्था, जालंधर
येथे सुरु असलेल्या आशिया चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत रविवारी यजमान भारत आणि मलेशिया यांच्यातील सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता खेळविला जाईल. सदर स्पर्धेमध्ये भारताने प्राथमिक फेरीतील आपले तिन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.
गेल्या महिन्यात नागोया जपान येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने अंतिम सामन्यात मलेशियाचा 5-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव करत सुवर्णपदक पटकाविले होते. आता हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघ रविवारच्या सामन्यात पुन्हा एकदा दर्जेदार खेळाचे प्रदर्शन घडविण्यासाठी सज्ज झाला आहे. या सामन्यात भारतीय हॉकी संघाच्या दर्जेदार कामगिरीची सत्त्वपरीक्षा पहावयास मिळेल.
जालंधरमध्ये सुरु असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताने सलामीच्या सामन्यात बांगलादेशचा 13-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव करुन विजयी सलामी दिली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने चीनचे आव्हान 5-2 असे संपुष्टात आणले. तसेच तिसऱ्या सामन्यात भारताने जपानचा 4-1 असा फडशा पाडत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. उपांत्य फेरीचा सामना मोहालीमध्ये 4 नोव्हेंबरला खेळविला जाईल.
रविवारी या स्पर्धेत दक्षिण कोरिया आणि बांगलादेश यांच्यातील सामना दुपारी 2.30 वाजता, जपान आणि चीन यांच्यातील सामना 4.45 वाजता होणार आहे.
