For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-चिनी तैपेई आज उपांत्यपूर्व लढत

06:22 AM May 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत चिनी तैपेई आज उपांत्यपूर्व लढत
Advertisement

वृत्तसंस्था, हॉर्सेन्स (डेन्मार्क)

Advertisement

2026 च्या थॉमस चषक सांघिक पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत शुक्रवारी येथे भारत आणि चिनी तैपेई यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे.

चार वर्षांपूर्वी भारतीय बॅडमिंटन संघाने दर्जेदार कामगिरी करत पहिल्यांदा थॉमस चषक पटकाविला होता. यावेळी भारतीय पुरूष बॅडमिंटन संघाने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे. अ गटात भारत दुसऱ्या स्थानावर असून त्यांची शुक्रवारची लढत अटीतटीची होईल. तैपेई संघाने आतापर्यंत एकदाही ही स्पर्धा जिंकलेली नाही. यावेळी या स्पर्धेत भारताने आपल्या मोहिमेला शानदार विजयाने प्रारंभ करताना पहिल्या लढतीत कॅनडाचा 4-1 असा पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या लढतीत भारताने ऑस्ट्रेलियाचे आव्हान 5-0 असे एकतर्फी संपुष्टात आणत उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. मात्र अ गटातील शेवटच्या प्राथमिक लढतीत बलाढ्या आणि विद्यमान विजेत्या चीनने भारताचा 3-2 अशा फरकाने पराभव केला.

Advertisement

चिनी तैपेईचा संघ निश्चितच दर्जेदार असून या संघात सहावा मानांकीत चोयु चेन तसेच विद्यमान अखिल इंग्लंड चॅम्पियन लीन चुन यी तसेच 21 वा मानांकीत ची यु चेन यांचा समावेश आहे. चीन तैपेईने दुहेरीत चीयु हेसांग ची आणि वेंग ची लीन तसेच ली हुई आणि यांग हेसन या दोन जोड्या उतरविल्या आहेत. या स्पर्धेमध्ये भारताने आतापर्यंत एकेरी आणि दुहेरीत समाधानकारक कामगिरी केली आहे.

भारतीय संघातील आयुष शेट्टी सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याने थॉमस चषक स्पर्धेत आतापर्यंत आपले एकेरीचे तिन्ही सामने जिंकले आहेत. त्याने ब्रायन यांग, वेंग यांग यांच्यावर शानदार विजय मिळविले. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या या लढतीत एचएस प्रणॉय आणि किदांबी श्रीकांत यांना उर्वरित दोन एकेरीच्या सामन्यात दर्जेदार कामगिरी करावी लागेल. गेल्या बुधवारी किदांबी श्रीकांतने चीनच्या झुचा पराभव केला होता. तसेच 2022 साली थॉमस चषक जिंकणाऱ्या भारतीय संघामध्ये एचएस प्रणॉयची कामगिरी दर्जेदार झाली होती. अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरी गाठणाऱ्या लक्ष्य सेनने या थॉमस चषक स्पर्धेत 3 पैकी 2 एकेरीचे सामने जिंकले आहेत. तसेच दुहेरीत सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी आपले सलामीचे दोन्ही सामने जिंकले होते. पण तिसऱ्या सामन्यात त्यांना चीनच्या लियांग केंग आणि वेंग चँग यांच्याकडून हार पत्करावी लागली होती. दुहेरीत खेळणारी भारताची आणखी एक जोडी हरिहरन ए. तसेच एमआर अर्जुन यांनी आपले आतापर्यंत तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत. थॉमस चषक स्पर्धेच्या इतिहासात 2022 साली भारताने विजेतेपद मिळविले होते तर 1952, 1955 आणि 1979 साली या स्पर्धेत भारताने कांस्यपदक मिळविले होते.

Advertisement
Tags :

.