भारत-अमेरिकेदरम्यान जुलैमध्ये व्यापार करार शक्य
दोन्ही देशांसाठी लाभदायक मार्ग शोधला : अमेरिकेचे वाणिज्यमंत्री
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
भारत आणि अमेरिकेदरम्यान जुलैपर्यंत व्यापार करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान अत्यंत लवकर व्यापार करार होणार आहे, कारण दोन्ही देशांसाठी लाभदायक मार्ग शोधण्यात आला आहे असा दावा अमेरिकेचे वाणिज्यमंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी केला आहे. वॉशिंग्टनमध्ये युएस-इंडिया स्टॅटेजिक पार्टनरशिप फोरमच्या लीडरशिप समिटमध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. तर दोन्ही देश परस्परांच्या व्यवसायांना प्राथमिकता देऊ इच्छितात आणि दोन्ही देशांच्या प्रतिनिधींदरम्यान सातत्याने चर्चा होत असल्याचे वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी स्पष्ट केले होते.
दोन्ही देशांच्या वतीने योग्य व्यक्ती चर्चा करू लागल्यावर व्यापार कराराला गती मिळाली आहे. आता करारासाठी फार वेळ लागणार नाही असे अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांनी म्हटले आहे. सूत्रांनुसार 8 जुलैपूर्वी दोन्ही देश एका अंतरिम करारावर पोहोचू शकतात.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 26 टक्के आयातशुल्क लादण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर दोन्ही देश व्यापार करारासाठी चर्चा करत आहेत. अमेरिकेचे आयातशुल्क 8 जुलैपासून लागू होणार आहे.
व्यापार कराराच्या अटींना अंतिम स्वरुप
अमेरिका आणि भारताने व्यापार कराराच्या अटींना अंतिम स्वरुप दिले असल्याचे अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांनी यापूर्वीच म्हटले होते. या अटींना टर्म्स ऑफ रेफरेन्स म्हटले जाते. एप्रिल महिन्यात अमेरिकेचे उपाध्यक्ष भारत दौऱ्यावर आले हेते. हा व्यापार करार अध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजनला साकार करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हा अंतिम करार एक रोडमॅप तयार करणार असल्याचे जेडी वेन्स यांनी नमूद केले होते.
अनेक देशांवर आयातशुल्क
2 एप्रिल रोजी ट्रम्प यांनी ‘लिबरेशन डे’चे नाव देत 100 हून अधिक देशांवर नवे आयातशुल्क लादण्याची घोषणा केली होती. हे आयातशुल्क अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करतील आणि अमेरिकेच्या उत्पादनांना नाकारणाऱ्या देशांना धडा शिकवतील असा दावा ट्रम्प यांनी केला होता. परंतु नंतर ट्रम्प यांनी चीनला वगळून उर्वरित देशांवरील आयातशुल्क 90 दिवसांसाठी रोखले होते. ट्रम्प यांच्या प्रत्युत्तरादाखल चीनने देखील अमेरिकेवर आयातशुल्क लादले होते.