भारत-अमेरिका व्यापार करार दृष्टिपथात
पंतप्रधान मोदी-ट्रम्प यांच्यात नेहमीच होतात बोलणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारासंदर्भात प्रगती होत असून असा करार आता दृष्टिपथात आला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात नेहमी दूरध्वनीवरून संपर्क केला जातो. नेहमीच हे दोन्ही नेते एकमेकांशी द्विपक्षीय संबंधांविषयी चर्चा करतात. त्यामुळे व्यापार करार होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. अशा अर्थाची माहिती भारताचे व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी दिली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अधिकृत अध्यक्षीय निवासस्थान व्हाईट हाऊसनेही ही माहिती दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंबंधी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अतिशय आदर आहे. ते नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान करतात. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार करण्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीरपणे चर्चा केली जात आहे. अडथळ्यांना दूर करण्याची प्रक्रिया केली जात आहे. व्यापाराप्रमाणेच आर्थिक सहकार्यासंबंधातही सविस्तर आणि सखोल चर्चा केली जात आहे, असे प्रतिपादन प्रवक्त्या कॅरोलाईन लेव्हीट यांनी केले. त्या मंगळवारी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत होत्या.
ट्रम्प यांना भारताविषयी आस्था
दीपावलीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दूरध्वनी केला होता. त्यावेळी महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली, या चर्चेत ट्रम्प यांच्यासह भारत आणि अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले होते. भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांवर अध्यक्ष ट्रम्प हे अत्यंत सकारात्मक आहेत. तसेच त्यांना भारताच्या संदर्भात तीव्र आस्था आहे, असेही लेव्हिट यांनी स्पष्ट केले. अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर हे या संदर्भात अत्यंत सक्रीय असून त्यांनी बऱ्याच बाबी मनावर घेऊन पुढे नेण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश येण्याची शक्यता आहे, याचाही लेव्हिट यांनी आवर्जून उल्लेख केला.
दक्षिण कोरियातील विधान
अध्यक्ष ट्रम्प यांनी नुकताच दक्षिण कोरियाचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात त्यांनी भारतासंबंधीही अनेक सकारात्मक विधाने केली आहेत. लवकरच भारत आणि अमेरिका यांच्यात एक व्यापक व्यापार करार होईल, असा मला विश्वास वाटतो, असे विधान त्यांनी जाहीररित्या केले होते. तसेच भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांमधील तणाव दूर होत आहे, याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
भारताच्या धोरणातही परिवर्तन
अमेरिकेने रशियाच्या रॉसनेफ्ट आणि लुकॉईल या सर्वात महत्वाच्या तेल विक्री कंपन्यांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे भारताने आता रशियाकडून कच्च्या इंधन तेलाची आयात बऱ्याच प्रमाणात कमी केली आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, अशी अमेरिकेची अट होती. तथापि, भारताने ती आत्तापर्यंत मानली नव्हती. मात्र, आता अमेरिकेने थेट रशियावरच निर्बंध घातल्याने भारतालाही आपल्या तेल खरेदी धोरणात परिवर्तन करावे लागले आहे. भारताच्या सरकारी आणि खासगी तेलशुद्धीकरण केंद्रांनी रशियाला नव्या ऑर्डरी देण्याचे थांबविले आहे. त्यामुळे अमेरिकेसमवेतच्या तणावाचे एक मुख्य कारण हळूहळू संपुष्टात येत आहे. त्यामुळे अमेरिकेसह व्यापार करार चर्चाही वेगवान होऊ लागली आहे. करार नेमका केव्हा होईल, याविषयी भविष्यवाणी आत्ताच करता येणार नसली, तरी भारतालाही फार घाई आहे, असे वाटत नाही. त्यामुळे थोड्या विलंबाने पण एक सकारात्मक करार होण्याची शक्यता बळावली असल्याचे अनेक तज्ञांचे मत आहे. कदाचित या वर्षांच्या अखेरीस या संदर्भातील चित्र अंतिमरित्या स्पष्ट होईल, असेही अनुमान आहे. व्हाईट हाऊस प्रवक्त्या कॅरोलाईन लेव्हिट यांच्या अलिकडच्या पत्रकार परिषदेतून या घडामोडींना दुजोरा मिळत आहे.