भारत-अमेरिका संबंध 30 वर्षांमधील सर्वात खराब
अमेरिकेच्या खासदाराचे वक्तव्य : ट्रम्प यांच्या एकतर्फी निर्णयांमुळे विश्वासाला तडा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध मागील 30 वर्षांमधील सर्वात खराब अवस्थेत पोहोचले आहेत. ट्रम्प यांचे शुल्क धोरण, इराणसोबत युद्ध आणि सहकारी देशांशी सल्लामसलत न करता निर्णय घेतले जात असल्याने अमेरिकेच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहोचल्याचे भारतीय वंशाचे अमेरिकेतील खासदार रो खन्ना यांनी सांगितले आहे. वॉशिंग्टनमध्ये आयोजित यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम लिडरशिप समिट 2026 ला त्यांनी संबोधित केले आहे.
अमेरिकेने भारत, युरोप आणि कॅनडासारख्या स्वत:च्या सहकारी देशांशी चर्चा न करता इराणवर सैन्य कारवाई केली. अशाप्रकारच्या निर्णयांमुळे सहकारी देशांचा विश्वास कमजोर झाल्याचा दावा खन्ना यांनी केला आहे.
विश्वासाची एक पिढी संपुष्टात
ट्रम्प यांचे शुल्क धोरण चुकीचे आहे, अलिकडेच चीन दौऱ्यादरम्यान मी एका भारतीय राजदूताला भेटलो. अमेरिकेच्या अध्यक्षांमुळे विश्वासाची एक पिढी संपुष्टात आल्याचे राजदूताने मला सांगितले. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे झालेले नुकसान मान्य न केल्यास ते सत्यापासून तोंड फिरविण्यासारखे ठरेल असे खन्ना म्हणाले. ट्रम्प हे ‘लेम डक’ अध्यक्ष असून डेमोक्रेटिक पार्टी आगामी मध्यावधी निवडणुकीत प्रतिनिधिगृहात बहुमत प्राप्त करेल आणि 2028 ची अध्यक्षीय निवडणूकही जिंकेल असा विश्वास खन्ना यांनी व्यक्त केला.
भारतासोबत मिळून काम करणार
अमेरिका भारतासोबत खांद्याला खांदा लावून काम करू इच्छितो आणि जागतिक स्तरावर भारताच्या वाढत्या शक्तीला पूर्णपणे स्वीकारतो. आम्ही भारतासोबत एक मोठा करार पूर्ण करण्याच्या समीप आहोत. प्रस्तावित व्यापार करार अंतिम टप्प्यात पोहोचल्याचा दावा भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी केला आहे.
मोदी-ट्रम्प मैत्रीचा किस्सा
गोर यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्या मैत्रीचा किस्साही ऐकविला. काही महिन्यांपूर्वी ट्रम्प हे सकाळी 6 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) पंतप्रधान मोदींना फोन करू इच्छित होते. मियामी येथील एका युएफसी इव्हेंटदरम्यान ट्रम्प यांच्यासोबत मी बॅकस्टेज बसला होतो. तेव्हा ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना फोन करूया असे म्हटले. भारतात त्यावेळी सकाळचे 6 वाजले असतील असे मी निदर्शनास आणून दिले. यावर ट्रम्प यांनी मोदी हे माझ्याप्रमाणे झोपून राहत नाहीत, ते जागे झाले असतील असे उद्गार काढले होते. ट्रम्प यांना काही क्षणानंतर व्यासपीठावर जायचे असल्याने दोन्ही नेत्यांमधील चर्चा दुसऱ्या दिवशी निश्चित करण्यात आली. ट्रम्प हे मोदींना स्वत:चा निकटचा मित्र मानतात. जेव्हा कुणी तुमचा मित्र असतो, तेव्हा प्रत्येक संभाषण पूर्वनिर्धारित करावे लागत नाही. ट्रम्प भारताचा आदर करतात आणि पंतप्रधान मोदींना इतर जागतिक नेत्यांपासून वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात. दोन्ही नेत्यांमधील हाच भरवसा भारत-अमेरिका संबंधांनाही मजबूत करत असल्याचे गोर म्हणाले.