टी-20 मानांकनात भारत अग्रस्थानी
वृत्तसंस्था, दुबई
आयसीसीतर्फे घोषित करण्यात आलेल्या पुरुषांच्या टी-20 ताज्या मानांकनात भारतीय संघाने पुन्हा अग्रस्थानावर झेप घेतली आहे. सध्या सुरु असलेल्या झिंबाब्वेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने एकतर्फी विजय मिळविला असल्याने त्यांनी या मानांकन यादीत पुन्हा अग्रस्थानावर झेप घेतली आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला इंग्लंडमधील झालेल्या मालिकेत 0-4 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच आयर्लंडने भारताचा 2-0 असा पराभव केला होता. या दोन मालिका भारताने सलग गमविल्यानंतर त्यांचे मानांकनातील अग्रस्थान डळमळीत झाले होते.
आयसीसीच्या टी-20 फलंदाजांच्या मानांकन यादीत भारताचा इशान किशन 892 मानांकन गुणासह पहिल्या, अभिषेक शर्मा 858 गुणासह दुसऱ्या, तिलक वर्मा 733 गुणासह आठव्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या विभागात भारताचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने आपले पाचवे स्थान कायम राखले आहे. मात्र तो झिंबाव्बेविरुद्धच्या मालिकेत खेळू शकला नव्हता.