सेंद्रिय खाद्यपदार्थांच्या निर्यातीत नवा टप्पा गाठणार भारत
नवी दिल्ली :
देशाच्या सेंद्रिय खाद्यपदार्थांच्या निर्यातीमध्ये पुढील वर्षी 1 अब्ज डॉलरचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताची सेंद्रिय खाद्यपदार्थांची निर्यात 494.80 दशलक्ष डॉलर्सची झाली होती.
2012-13 मध्ये पाहता भारताने 213 दशलक्ष डॉलर्सच्या सेंद्रिय खाद्यपदार्थांची निर्यात केली होती. अमेरिका, युरोपियन संघ, कॅनडा, इंग्लंड, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, मध्य आशिया आणि आशियाई देशांना भारत सेंद्रिय खाद्यपदार्थांचा पुरवठा करत आला आहे. यामध्ये डाळी आणि कडधान्ये त्याचबरोबर प्रक्रिया केलेले पदार्थ, चहा, मसाले आणि वैद्यकीय वनस्पती यांचा समावेश आहे. समुद्री माशांचा पुरवठा सुद्धा मोठ्या प्रमाणात भारताकडून केला जात आहे.
तंबाखू निर्यात आणि उत्पादन
याचदरम्यान भारतातून तंबाखूचीही निर्यात होत असते. यावर्षी भारताकडून तंबाखूची निर्यात ही 13000 कोटींची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये तंबाखूच्या निर्यातीमध्ये 8 टक्के इतकी वाढ होऊ शकते. वाणिज्य मंत्रालयाकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. चीन हा तंबाखू उत्पादनामध्ये सर्वात मोठा देश असून त्यापाठोपाठ भारत हा दुसऱ्या नंबरचा मोठा तंबाखू उत्पादक देश आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये 12005 कोटी रुपयांच्या तंबाखूची निर्यात करण्यात आली होती. मागच्या वर्षी भारताने 300 दशलक्ष किलोग्रॅम इतक्या तंबाखूचे उत्पादन घेतले होते.