महिला आशिया कप हॉकी भारताची सलामी थायलंडशी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतीय महिला हॉकी संघ 5 सप्टेंबर रोजी थायलंडविरुद्ध आशिया कप मोहिमेची सुरुवात करेल आणि त्यानंतर गतविजेत्या जपान आणि सिंगापूरविरुद्ध सामना करेल, अशी माहिती हॉकी इंडियाने बुधवारी दिली. मागील आवृत्तीत कांस्यपपदक जिंकणारा भारतीय संघ जपान, थायलंड आणि सिंगापूरसह गट ब मध्ये आहे तर गट अ मध्ये यजमान चीन, कोरिया, मलेशिया आणि चिनी तैपेई यांचा समावेश आहे. ही स्पर्धा 5 ते 14 सप्टेंबर दरम्यान चीनमधील हांगझाऊ येथे होणार आहे आणि विजेत्या संघाला 2026 च्या विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळेल. भारताचा दुसरा सामना 6 सप्टेंबर रोजी जपानविरुद्ध असेल. त्यानंतर 8 सप्टेंबर रोजी सिंगापूरविरुद्ध गटातील अंतिम सामना होईल.
गतविजेत्या जपानसोबत पूल ब मध्ये स्थान मिळाल्याने सुरुवातीपासूनच आमचे कौशल्य आणि जिगर तपासली जाईल. तथापि, पूल टप्प्यात त्यांचा सामना करणे ही स्पर्धेच्या सुरुवातीला स्वत:चे मूल्यांकन करण्याची एक उत्तम संधी असेल, असे भारताची कर्णधार सलीमा टेटे म्हणाली. आमचे लक्ष स्मार्ट, शिस्तबद्ध हॉकी खेळण्यावर आणि एकावेळी एक सामना जिंकण्यावर असेल. अंतिम ध्येय म्हणजे ट्रॉफी जिंकणे आणि 2026 च्या महिला एफआयएच
हॉकी विश्वचषकात थेट स्थान मिळवणे. भारताने 2017 मध्ये आशिया कप जिंकला होता. त्यावेळी त्यांनी अंतिम सामन्यात चीनला हरवले होते. फॉरमॅटनुसार प्रत्येक पूलमधील अव्वल दोन संघ सुपर 4 एस पूलमध्ये जातील. तिथे प्रत्येक संघ इतर तीन संघांविरुद्ध एक सामना खेळेल. सुपर 4 एस पूलमधील आघाडीचे दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. तर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघ तिसऱ्या व चौथ्या स्थानाच्या सामन्यात खेळतील. पूल अ आणि पूल ब मधील तळाचे दोन संघ स्पर्धेत 5 व्या ते 8 व्या स्थानासाठी वर्गवारीचे सामने खेळतील.