महिला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भारताकडे
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी महिला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद श्रीलंकेकडून काढून भारताला दिले. स्पर्धेची पहिली आवृत्ती 14 ते 28 फेब्रुवारी 2027 दरम्यान मुंबई आणि वडोदरा येथे होणार आहे. श्रीलंका क्रिकेटमध्ये सुरू असलेल्या प्रशासकीय समस्यांमुळे यजमानपद बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. आयसीसी बोर्डाने 2 सप्टेंबर रोजी भारताच्या यजमानपदाला मंजुरी दिली.
मुंबई-वडोदरा येथे रंगणार सामने
मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि वडोदरा इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे स्पर्धेचे सामने खेळवले जातील. या ऐतिहासिक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे सहा संघ सहभागी होणार आहेत. सहा संघांमध्ये राऊंड-रॉबिन पद्धतीने सामने होतील. त्यानंतर गुणतालिकेतील अव्वल दोन संघ 28 फेब्रुवारीला होणाऱ्या अंतिम सामन्यात आमनेसामने येतील. या सहा संघांची निवड 6 जुलैच्या आयसीसी महिला टी-20 क्रमवारीतील स्थानानुसार करण्यात आली आहे.
महिला क्रिकेटसाठी नवे पर्व
पुऊषांची चॅम्पियन्स ट्रॉफी 50 षटकांच्या स्वरूपात खेळवली जाते. भारताने यापूर्वी महिला वनडे विश्वचषकाचे यजमानपद भूषवले होते आणि भारतीय संघाने त्या स्पर्धेत ऐतिहासिक विजेतेपद मिळवले होते. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 ही महिला क्रिकेटसाठी नव्या पर्वाची सुऊवात असल्याचे म्हटले. जगातील सर्वोत्तम संघांना एका उच्च दर्जाच्या स्पर्धेत एकत्र आणण्याबरोबरच महिला क्रिकेटला जागतिक स्तरावर अधिक गती मिळेल, असे त्यांनी सांगितले. दरवषी आयसीसीची एक मोठी महिला क्रिकेट स्पर्धा आयोजित होत असल्याने खेळाडू, संघ आणि चाहत्यांसाठी महिला क्रिकेटमध्ये अधिक सातत्य आणि उत्साह निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भारताची निवड का झाली ?
ही स्पर्धा मूळत: श्रीलंकेत होणार होती. मात्र, श्रीलंका क्रिकेटला आयसीसीच्या वार्षिक परिषदेत जुलैमध्ये निश्चित करण्यात आलेल्या आवश्यक सुधारणांची अंमलबजावणी करायची आहे. त्यामुळे पर्यायी यजमान म्हणून बांगलादेश, भारत आणि दक्षिण आफ्रिका या तीन देशांचा विचार करण्यात आला. आयसीसीच्या यजमानपदाच्या निकषांनुसार मूल्यांकन केल्यानंतर भारताची निवड करण्यात आली.