भारताला मिळणार ६ नवी रिफ्युलिंग विमाने !
इस्रायली कंपनीला 8 हजार कोटींचा करार मिळण्याची शक्मयता : वायुदलाच्या क्षमतेत पडणार भर
भारतीय वायुदलाची सामरिक क्षमता वाढवण्यासाठी सहा नवीन हवेत इंधन भरणारी विमाने खरेदी करण्याचा मार्ग मोकळा होत असल्याचे चित्र आहे. इस्रायलची सरकारी कंपनी इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज (आयएआय) सुमारे 905.7 दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास 8 हजार कोटी ऊपयांचा हा करार मिळवण्याच्या जवळ आहे.
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
इस्रायली माध्यमांच्या माहितीनुसार, भारतीय वायुदलासाठी सहा बोईंग 767 प्रवासी विमानांचे हवेत इंधन भरणाऱ्या टँकर विमानांमध्ये रूपांतर केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक तांत्रिक आणि अन्य निकष पूर्ण करणारी आयएआय ही एकमेव कंपनी उरली आहे. रशिया आणि युरोपमधील कंपन्यांचे प्रस्ताव निर्धारित निकषांवर पात्र ठरले नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कराराला अंतिम मंजुरी आणि इतर आवश्यक प्रक्रिया अद्याप बाकी आहेत.
‘मेक इन इंडिया“अंतर्गत 30 टक्के काम भारतात
या प्रकल्पासाठी आयएआय सहा बोईंग 767 विमाने खरेदी करणार आहे. यातील किमान 30 टक्के काम भारतात करण्याची कंपनीने तयारी दर्शवली आहे. ‘मेक इन इंडिया“ उपक्रमांतर्गत हा प्रकल्प राबवला जाणार आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या प्रकल्पात भारतीय भागीदार म्हणून सहभागी होण्याची शक्मयता आहे. विमानांमध्ये स्थानिक प्रणाली बसवणे, वायरिंग करणे आणि संरचनेत आवश्यक बदल करणे अशी कामे एचएएलकडे सोपवली जाऊ शकतात. सर्व मंजुरी मिळाल्यानंतर 2028 ते 2030 या कालावधीत विमानांची डिलिव्हरी होण्याची शक्मयता आहे.
हवेतच लढाऊ विमानांमध्ये इंधन भरणार
हवेत इंधन भरणारी विमाने ही विशेष लष्करी विमाने असतात. ही विमाने उ•ाणादरम्यान इतर लढाऊ विमानांमध्ये इंधन भरू शकतात. त्यामुळे लढाऊ विमानांना जमिनीवर उतरल्याशिवाय अधिक काळ हवेत राहता येते आणि लांब पल्ल्याच्या मोहिमा पूर्ण करता येतात. आयएआयच्या बेडेक एव्हिएशन ग्रुपने जुन्या बोईंग 767 प्रवासी विमानांचे लष्करी टँकर आणि वाहतूक विमानांमध्ये रूपांतर करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
राफेल आणि सुखोईची क्षमता वाढणार
नवीन टँकर विमाने भारतीय वायुदलातील जुन्या रशियन बनावटीच्या इल्यूशिन आयएल-78 विमानांची जागा घेऊ शकतात किंवा त्यांना पूरक म्हणून वापरली जाऊ शकतात. या विमानांच्या मदतीने राफेल आणि सुखोई-30 एमकेआय यांसारख्या लढाऊ विमानांची लांब पल्ल्याच्या मोहिमा पार पाडण्याची क्षमता वाढेल. याशिवाय मालवाहतूक, सैनिकांची ने-आण आणि सामरिक वाहतुकीसाठीही या विमानांचा वापर करता येणार आहे.
आयएआयला 40 वर्षांहून अधिक अनुभव
हवेत इंधन भरण्याच्या तंत्रज्ञान क्षेत्रात आयएआयला 40 वर्षांहून अधिक अनुभव आहे. कंपनीने जगभरातील 12 पेक्षा अधिक ग्राहकांसाठी अशा प्रकारची अनेक विमाने तयार केली आहेत. त्यामध्ये इस्रायलच्या वायुदलाचाही समावेश आहे. हा करार पूर्ण झाल्यास भारतीय वायुसेनेची लांब पल्ल्याच्या लष्करी मोहिमा राबवण्याची क्षमता वाढण्यास मदत होईल. तसेच संरक्षण क्षेत्रातील देशांतर्गत कंपन्यांचा सहभागही वाढणार आहे.
