भारत दोन आण्विक पाणबुड्या बांधणार
अमेरिकेकडून 31 प्रिडेटर ड्रोन खरेदी करणार : 80 हजार कोटींच्या करारांना मंजुरी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने बुधवारी दोन आण्विक पाणबुड्यांच्या स्वदेशी बांधणीला मंजुरी दिली. याशिवाय अमेरिकेकडून 31 प्रिडेटर ड्रोन खरेदी करण्याच्या करारालाही मान्यता देण्यात आली आहे. या 31 पैकी नौदलाला 15 ड्रोन युनिट्स मिळतील, तर लष्कर आणि हवाई दलाला प्रत्येकी 8 युनिट्स मिळतील. सदर ड्रोन्स भारतीय ताफ्यात सहभागी झाल्यानंतर सुरक्षा दलाची ताकद वाढणार आहे. या दोन्ही करारांची किंमत 80 हजार कोटी ऊपये आहे.
अणुऊर्जेवर चालणाऱ्या दोन पाणबुड्या विशाखापट्टणममधील जहाज बांधणी केंद्रात बांधल्या जाणार असल्याची माहिती गुरुवारी देण्यात आली. लार्सन आणि टुब्रो सारख्या खासगी कंपन्या देखील त्यांच्या निर्मितीमध्ये सहभाग घेणार असून ह्या पाणबुड्या भारतीय बनावटीच्या असणार आहेत. दोन्ही पाणबुड्या तयार करण्यासाठी 40 हजार कोटी ऊपये खर्च केले जाणार आहेत. ह्या पाणबुड्या सज्ज झाल्यानंतर नौदलाच्या स्वाधीन केल्या जाणार आहेत. नौदलाने जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान मोदींसमोर या पाणबुड्यांसाठी कराराचा प्रस्ताव मांडला होता.
अमेरिकेकडून 31 प्रिडेटर ड्रोन खरेदी करण्यासंबंधीच्या प्रस्तावालाही केंद्रीय सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली आहे. यासाठीचा करार 40 हजार कोटी रुपयांचा आहे. या कराराची मुदत केवळ 31 ऑक्टोबरपर्यंत होती. म्हणजे 31 ऑक्टोबरपूर्वी हे ड्रोन खरेदी करायचे की नाही हे केंद्र सरकारला ठरवायचे होते. या 31 ड्रोनमध्ये हेलफायर मिसाईल्सचाही समावेश आहे. हे ड्रोन अचूक-मार्गदर्शित बॉम्ब आणि हाय-फायर रोटरी तोफांसह लक्ष्यांवर हल्ला करू शकतात. हे ड्रोन जनरल अॅटोमिक्स या अमेरिकन कंपनीने बनवले आहेत. खुद्द अमेरिकेनेच हा प्रस्ताव दिला होता. अमेरिकेकडून खरेदी केलेल्या 31 ड्रोनपैकी काही भारतात असेंबल केले जातील. त्यापैकी 30 टक्के पार्ट्स भारतीय पुरवठादारांकडून खरेदी केले जाणार आहेत.
आण्विक पाणबुडीची आवश्यकता
अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी बराच काळ पाण्याखाली राहू शकते. डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडींना बॅटरी चार्ज करण्यासाठी दिवसातून एकदा तरी पृष्ठभागावर जावे लागते. यादरम्या डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडीवर हल्ला होऊ शकतो. याशिवाय डिझेल पाणबुड्या हवाई हल्ल्यांना बळी पडतात. त्यामुळेच नौदलाने अणुऊर्जेवर चालणाऱ्या स्ट्राईक पाणबुडीची मागणी लावून धरली. नौदलाला हिंदी महासागर क्षेत्रात पाळत ठेवण्यासाठी या पाणबुड्यांची गरज आहे.