For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचा लक्ष्य सेन सेमीफायनलमध्ये

06:34 AM Mar 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताचा लक्ष्य सेन सेमीफायनलमध्ये
Advertisement

ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन : मलेशियाच्या माजी विजेत्या ली झीचा केला पराभव

Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

भारताचा युवा स्टार शटलर लक्ष्य सेनने ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमधील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत मलेशियाचा माजी चॅम्पियन ली झीचा रोमांचक सामन्यात पराभव केला आणि थाटात सेमीफायनल गाठली. 22 वर्षीय लक्ष्य सेनने पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडल्यानंतर शानदार पुनरागमन केले आणि 71 मिनिटांत सामना जिंकून अंतिम चारमध्ये प्रवेश केला.

Advertisement

शनिवारी झालेल्या ऑल इंग्लंड ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत 22 वर्षीय लक्ष्य सेनने झीचा 20-22, 21-16, 21-19 असा पराभव केला. उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत 18 व्या स्थानी असलेल्या लक्ष्य सेनचा सामना 9 व्या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्टीशी होईल. विशेष म्हणजे, या स्पर्धेत लक्ष्य सेन वगळता इतर सर्व भारतीय खेळाडूंचे आव्हान याआधीच संपुष्टात आले आहे.

71 मिनिटाच्या संघर्षमय सामन्यात लक्ष्यची बाजी

लक्ष्य सेन आणि ली झी यांच्यातील सामना चांगलाच चुरशीचा झाला. सुरुवातीपासूनच दोन्ही खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. नेटजवळ लक्ष्यने शानदार खेळ करत पहिल्या गेममध्ये 8-3 अशी आघाडी घेतली. परंतु लीने जोरदार पुनरागमन करत 12-12 अशी बरोबरी केली. यानंतर दोघांमधील सामना 20-20 असा बरोबरीत सुटला. पण, मोक्याच्या क्षणी लीने दोन गुणाची कमाई करत पहिला गेम 22-20 असा जिंकत 1-0 अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या गेममध्ये मात्र लक्ष्यने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत 11-9 अशी आघाडी घेतली. त्याने नेटजवळ सरस खेळ करत दुसरा गेम 21-16 असा जिंकला व सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. यानंतर लक्ष्यने आपला धडाका तिसऱ्या गेममध्येही कायम ठेवला. आपल्या कामगिरीत सातत्य राखत त्याने 11-8 अशी आघाडी घेतली. ही आघाडी कायम ठेवत त्याने तिसरा गेमही 21-19 असा जिंकला. हा सामना तब्बल 71 मिनिटे चालला. विशेष म्हणजे, 2021 मधील ऑल इंग्लंड चॅम्पियन ली झी विरुद्ध लक्ष्य सेनचा गेल्या पाच सामन्यांमधील हा चौथा विजय आहे.

ऑल इंग्लंडमध्ये भारताच्या आशा पल्लवित

प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेत प्रकाश पदुकोण (1981) व पुलेला गोपीचंद (2001) यांनीच जेतेपद पटकावले आहे. यानंतर तब्बल 23 वर्षानंतर लक्ष्यने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. लक्ष्यने याआधी 2022 या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे. आता, पुन्हा लक्ष्यला उपांत्य व अंतिम फेरीत शानदार कामगिरी करत जेतेपद मिळवण्याची नामी संधी असणार आहे.

Advertisement
Tags :

.