भारत मालदीवच्या लोकशाहीचा समर्थक
मालदीवच्या माजी अध्यक्षांनी भारतावरील आरोप फेटाळले : मुइज्जूंना हटविण्याच्या कटाचा दावा खोटा
वृत्तसंस्था/ माले
मालदीवचे माजी अध्यक्ष आणि विरोधी पक्षाचे नेते मोहम्मद नशीद यांनी वर्तमान अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या विरोधात महाभियोग आणण्याचा कट आणि त्यात भारताच्या भूमिकेचा आरोप फेटाळला आहे. अमेरिकेतील वृत्तपत्र द वॉशिंग्टन पोस्टने मुइज्जू यांना पदावरून हटविण्यासाठी विरोधी पक्षाने कट रचला होता आणि याकरता भारताकडून 51 कोटीची मदत मागितली जाणार होती, असा दावा केला होता. द वॉशिंग्टनच्या पोस्टच्या वृत्त अहवालावर प्रतिक्रिया देताता नशीद यांनी अशाप्रकारच्या कुठल्याही कटाची कल्पना नसल्याचे आणि भारत कधीच अशाप्रकारच्या कटाचे समर्थन करणार नसल्याचे म्हटले आहे. भारत नेहमीच मालदीवच्या लोकशाहीचे समर्थन करतो. भारताने कधीच आमच्यावर अटी लादलेल्या नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.
40 खासदारांना लाच देण्याचा दावा
डेमोक्रेटिक रिन्युअल इनिशिएटिव्ह नावाचे काही दस्तऐवज आपल्याकडे असल्याचा दावा द वॉशिंग्टन पोस्टने केला होता. या दस्तऐवजांमध्ये मुइज्जू यांना सत्तेवरून हटविण्याचे प्लॅनिंग नमूद आहे. मुइज्जू यांना सत्तेवरून हटविण्यासाठी 40 खासदारांना लाच देण्याचा प्लॅन आखण्यात आला होता, यात मुइज्जू यांच्या पीपल्स नॅशनल काँग्रेसचेही खासदार आहेत. हे सर्व खासदार मुइज्जू यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणार होते. तसेच खासदारांसोबत सैन्य आणि 10 वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि काही गुन्हेगारी टोळ्यांनाही पैसे देण्याचा प्लॅन आखण्यात आला होता. याकरता कट रचणाऱ्यांनी 51 कोटी रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम भारताकडून मागितली जाणार होती, असा दावा द वॉशिंग्टन पोस्टने मालदीवच्या दोन अधिकाऱ्यांचा दाखला देत केला होता.
रॉची भूमिका असल्याचा दावा
वॉशिंग्टन पोस्टने स्वत:च्या वृत्त अहवालात भारताची गुप्तचर यंत्रणा रॉच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मुइज्जू यांना मालदीवच्या अध्यक्षपदावरून हटविण्याच्या योजनेवर चर्चा केली होती, असा दावा केला आहे. मुइज्जू यांच्या परिवाराच्या एक सदस्याने या संभाषणाचे काही रिकॉर्डिंग दिले आहे. यात रॉचा वरिष्ठ गुप्तचर अधिकारी आणि अन्य भारतीय हस्तकांमधील मुइज्जू यांना मालदीवच्या अध्यक्ष पदावरून हटविण्यासंबंधीचे संभाषण असल्याचे द वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्त अहवालात म्हटले गेले आहे.
भारताने पुरविला नाही निधी
कथित स्वरुपात या हस्तकांमध्ये माजी भारतीय पोलीस अधिकारी शिरीष थोरात आणि भाजपचे प्रवक्ते सावियो रोड्रिग्स सामील होते. या सर्वांदरम्यान या मुद्द्यावर वॉशिंग्टनमध्ये चर्चा झाली होती. अनेक महिन्यांपर्यंत चाललेल्या गुप्त चर्चेनंतरही मुइज्जू यांच्या विरोधात महाभियोग चालविण्यासाठी पुरेशा प्रमाणात खासदारांचे संख्याबळ जमविण्यास अपयश आले होते. यानंतर भारतानेही मुइज्जू यांना पदावरून हटविण्याच्या प्रयत्नाला पुढे नेले नाही आणि निधीही उपलब्ध केला नसल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.
मुइज्जू यांच्या भूमिकेत बदल
मुइज्जू 2023 मध्ये मालदीवचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. प्रारंभिक काळात मुइज्जू यांनी भारताच्या विरोधात भूमिका घेतली होती. परंतु यामुळे मालदीवच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत असल्याचे उमगल्यावर मुइज्जू यांनी स्वत:च्या धोरणांमध्ये बदल करत भारताशी जुळवून घेण्यास सुरुवात केली. यामुळे भारत आणि मालदीव यांच्यातील तणाव आता बऱ्याचअंशी निवळला आहे. मुइज्जू यांनी मागील काळात भारताचा दौराही केला आहे.