भारताला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी राखण्यात यश
भारतीय महिला हॉकी संघाचा चीनवर 1-0 ने विजय, युवा आघाडीपटू दीपिकाने नोंदवला निर्णायक गोल
वृत्तसंस्था/ राजगीर, बिहार
युवा आघाडीपटू दीपिका पुन्हा एकदा उत्कृष्ट रिव्हर्स हिटवरील गोलच्या जोरावर स्टार बनली असून तिच्या कामगिरीच्या जोरावर भारताने ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या चीनला बुधवारी 1-0 ने पराभूत करून महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे (एसीटी) विजेतेपद राखले.
दीपिकाने 31 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर भारताचा विजयी गोल केला आणि 11 गोलांसह ती स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारी खेळाडू ठरली. भारताने याआधी स्पर्धेच्या साखळी टप्प्यात चीनचा 3-0 असा पराभव केला होता. 2016 आणि 2023 मध्ये ही स्पर्धा जिंकलेल्या भारताचे हे तिसरे एसीटी विजेतेपद आहे. भारत आणि दक्षिण कोरिया हे आता प्रत्येकी तीन विजेतेपदांसह स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी संघ बनले आहेत.
दुसरीकडे चीनला तिसऱ्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. आदल्या दिवशी झालेल्या तिसऱ्या-चौथ्या स्थानासाठीच्या सामन्यात मलेशियाला 4-1 ने पराभूत करून जपानने तिसरे स्थान पटकावले. संपूर्ण सामन्यात चीन व भारतादरम्यान चुरशीची लढत झाली. दोन्ही संघांनी अनेकदा विरोधी गोलक्षेत्रात प्रवेश केला, परंतु पहिल्या दोन सत्रांत दोन्ही बाजूंची बॅकलाइन अभेद्य भिंतीप्रमाणे उभी राहिली.
17 वर्षीय सुनीलिता टोप्पो तिच्या ड्रिब्लिंग कौशल्याने बचावफळीत उठून दिसली आणि तिने दोन्ही बाजूंकडून रक्षण केले. दुसऱ्या सत्रात तीन मिनिटांत चीनने सामन्याचा पहिला पेनल्टी कॉर्नर मिळवला, पण भारताची दुसरी गोलरक्षक बिचूदेवी खारिबमने जबरदस्त सूर मारत जिंझुआंग टॅनला रोखले. पुढच्या दोन मिनिटांत भारतीयांनी तब्बल चार पेनल्टी कॉर्नर मिळवले, पण एकही पेनल्टी फायदा उठविण्यात ते अयशस्वी ठरले. यापैकी बहुतेक पेनल्टी कॉर्नर दीपिकाने फटकावले.
पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर हा या स्पर्धेत भारतासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. जपानविऊद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यात त्यांना 13 पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण एकदाही चेंडू जाळ्यात सारण्यात त्यांना अपयश आले. 23 व्या मिनिटाला चीनला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता, पण तो निष्फळ ठरविण्यात आला. काही मिनिटांनंतर कर्णधार सलीमा टेटेने शर्मिला देवीला सुरेख पास दिला, पण फटका गोलखांब्यावर आदळून मध्यांतराला कोंडी कायम राहिली.
मध्यांतरानंतर भारताने चिनी बचावफळीवर दबाव कायम ठेवला आणि पाचवा पेनल्टी कॉर्नर मिळवला. यावेळी दीपिकाने रिव्हर्स हिटसह चेंडू जाळ्यात सारला. 42 व्या मिनिटाला दीपिकाला तिची गोलसंख्या वाढवण्याची उज्ज्वल संधी होती. यावेळी तिला पेनल्टी स्ट्रोक मिळाला होता. पण चीनची गोलरक्षक ली टिंगने तिला संधी नाकारत अप्रतिमरीत्या फटका अडविला. काही मिनिटांनंतर भारताच्या सहाव्या पेनल्टी कॉर्नरवर सुशिला चानूचा फटका रोखून टिंग पुन्हा एकदा चीनच्या बचावासाठी धावून आली. केवळ एका गोलने पिछाडीवर असताना चीनने त्यानंतर सारा जोर पणाला लावला आणि काही प्रसंगी भारतीय गोलक्षेत्रातही प्रवेश केला. परंतु यजमानांचा बचाव अभेद्य राहिला.