भारताची अंतिम फेरीत धडक
दक्षिण कोरियावर 8-1 गोलफरकाने दणदणीत विजय : जपानशी जेतेपदाची लढत आज
वृत्तसंस्था, मोहाली : पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या भारताने बुधवारी येथे झालेल्या पुरुष आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत दक्षिण कोरियाचा 8-1 असा धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात शिलानंद लाक्रा आणि दिलप्रीत सिंग यांनी प्रत्येकी दोन गोल केले.
शिलानंद लाक्राने चौथ्या आणि 13 व्या मिनिटाला, तर दिलप्रीत सिंगने 21 व्या आणि 25 व्या मिनिटाला गोल नोंदवले. याशिवाय कर्णधार हरमनप्रीत सिंग (9 व्या मिनिटाला), सुखजीत सिंग (21 व्या मिनिटाला), अंगद बीर सिंग (36 व्या मिनिटाला) आणि विवेक सागर प्रसाद (54 व्या मिनिटाला) यांनी भारतासाठी गोल केले. भारत विक्रमी सातव्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. दक्षिण कोरियासाठी एकमेव गोल सांगजुन हानने (9 व्या मिनिटाला) केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भारत आता गुरुवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात जपानशी भिडणार आहे.
जपान अंतिम फेरीत
पहिल्या उपांत्य सामन्यात जपानने मलेशियाचा पेनल्टी शूटआउटमध्ये 5-3 असा पराभव केला; तत्पूर्वी, निर्धारित वेळेत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नव्हता. साखळी फेरीतही भारताने दक्षिण कोरियाचा 8-0 असा पराभव केला होता. यजमान भारत या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिला असून, सहा संघांच्या साखळी फेरीत त्यांनी पाचही सामने जिंकून अव्वल स्थान पटकावले होते. मध्यंतरापर्यंत भारताकडे 6-1 अशी आघाडी होती; त्यांनी पहिल्या दोन सत्रांत प्रत्येकी तीन गोल केले. या सामन्यात भारताला चार पेनल्टी कॉर्नर मिळाले, तर दक्षिण कोरियाला एकही पेनल्टी कॉर्नर मिळाला नाही.
सामन्याच्या चौथ्या मिनिटाला शिलानंद लाक्राने मैदानी गोल करत भारताला सुरुवातीची आघाडी मिळवून दिली. मात्र, नवव्या मिनिटाला सांगजुन हानने मैदानी गोल करत दक्षिण कोरियासाठी बरोबरी साधली. भारताने प्रतिस्पर्धी संघाच्या सर्कलमध्ये वारंवार आक्रमण करत आपले वर्चस्व कायम राखले आणि नवव्या मिनिटाला एक पेनल्टी कॉर्नर मिळवला, ज्यावर कर्णधार हरमनप्रीत सिंगने अचूक गोल केला. चार मिनिटांनंतर, पेनल्टी कॉर्नरवर मिळालेल्या रिबाउंडवर लाक्राने आपला दुसरा गोल नोंदवला आणि भारताला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. दुस्रया सत्रातही भारताने दक्षिण कोरियावर आपले वर्चस्व कायम राखत पाच मिनिटांच्या अंतरात तीन मैदानी गोल केले. 21 व्या मिनिटाला सुखजीतने मैदानी गोल (फील्ड गोल) केला आणि काही क्षणांनंतर दिलप्रीतनेही मैदानी खेळाद्वारे गोल नोंदवला. 25 व्या मिनिटाला दिलप्रीतने आणखी एक मैदानी गोल करत आपली वैयक्तिक गोलसंख्या दोनवर नेली, ज्यामुळे भारताने 6-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतरच्या 15 मिनिटांच्या दोन सत्रांत भारताने प्रत्येकी एक गोल केला. मध्यंतराच्या अवघ्या सहा मिनिटांनंतर अंगद बीर सिंगने मैदानी गोल करत भारताची आघाडी अधिक मजबूत केली. त्यानंतर 54 व्या मिनिटाला विवेक सागर प्रसादने आणखी एक मैदानी गोल करून विजयावर शिक्कामोर्तब केला.