भारत - श्रीलंका एकदिवसीय मालिका आजपासून
वृत्तसंस्था /कोलंबो
भारताच्या श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आज शुक्रवारपासून येथे सुऊवात होत आहे. के. एल. राहुल आणि रिषभ पंत यांच्यापैकी कोणाला एकदिवसीय सामन्यातील भारताचा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून पहिली पसंती द्यायची हे ठरविण्याची संधी गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ व्यवस्थापनाला या मालिकेतून मिळेल. नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषक विजयानंतर दिग्गज रोहित शर्मा आणि विराट कोहली हेही संघात परतणार असून तेही एक वेगळे वैशिष्ट्या राहणार आहे.
राहुल हा सध्याचा यष्टिरक्षक फलंदाज आहे आणि गेल्या वर्षीच्या आशिया चषकापासून राहुल द्रविडच्या आधीच्या रचनेत त्याला ही भूमिका सोपवण्यात आली होती. तेव्हापासून राहुलने फलंदाज आणि यष्टिरक्षण म्हणून पूर्ण न्याय दिला आहे. पण पंत परत आल्याने गंभीर तोच मार्ग अवलंबणार का असा सवाल निर्माण झाला आहे. गंभीर आणि कर्णधार रोहित यांनी राहुल आणि पंत या दोघांनाही ठेवण्याचा निर्णय घेतला, तर श्रेयस अय्यरला कसे सामावून घ्यायचे याचा विचार त्यांना करावा लागेल.
भारताला या तिघांपैकी दोघांना निवडावे लागेल. पण जर या तिन्ही खेळाडूंना खेळविण्याचा निर्णय घेतला, तर भारताला पाच गोलंदाजांसह खेळावे लागेल. पण विशेषत: हार्दिक पंड्या वैयक्तिक कारणांमुळे या मालिकेत सहभागी झालेला नसल्याने भारत त्या मार्गावरून जाणे कदाचित पसंत करणार नाही. त्यामुळे सहाव्या क्रमांकावर शिवम दुबे किंवा रियान पराग यापैकी एकाला संधी देण्याचा मोह होऊ शकतो. पराग ऑफस्पिन आणि लेगस्पिनही टाकू शकत असल्याने त्याची संधी वाढलेली आहे. या सगळ्यादरम्यान गंभीरचे रोहित आणि कोहलीच्या खेळावरही लक्ष राहील. अहमदाबाद येथे गेल्या वर्षी विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविऊद्ध झालेल्या पराभवानंतर या दोघांचा हा पहिलाच एकदिवसीय सामना असेल आणि ते जोरदार खेळीसह पुनरागमन करण्यास उत्सुक असतील.
पथिराना, मदुशंका दुखापतीमुळे बाहेर
भारताविऊद्धच्या वनडे मालिकेपूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. कारण वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना आणि दिलशान मदुशंका हे दुखापतीमुळे खेळू शकले नाहीत. श्रीलंका क्रिकेटने गुऊवारी जारी केलेल्या निवेदनातून जाहीर केले आहे की, संघाच्या क्षेत्ररक्षणाच्या सरावादरम्यान मदुशंकाच्या डाव्या पायाला धोंडशिरेची दुखापत झाली आहे, तर पाथिरानाचा उजवा खांदा दुखावलेला आहे. यजमानांनी दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी मोहम्मद शिराज आणि एशान मलिंगाला संघात आणले आहे. दरम्यान, कुसल जनिथ, प्रमोद मदुशान आणि जेफ्री वँडरसे यांना राखीव म्हणून संघात सामील करण्यात आले आहे.
►भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, के. एल. राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
►श्रीलंका : चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, निशान मदुष्का, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, चमिका कऊणारत्ने, महीश थीक्षाना, अकिला धनंजय, एशान मलिंगा, मोहम्मद शिराज, असिथा फर्नांडो, राखीव : कुसल जेनिथ, प्रमोद मदुशान, जेफ्री वँडरसे.
सामन्याची वेळ : दुपारी 2.30 वा.