ट्रूडो यांना भारताची पुन्हा फटकार
भारतीय अधिकाऱ्यांवरच्या सर्व आरोपांचा इन्कार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताने कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांना पुन्हा फटकारले आहे. ट्रूडो यांनी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येसंबंधात कॅनडातील भारतीय उच्चायोगाच्या अधिकाऱ्यांवर केलेले आरोप बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने प्रेरित असून ही ट्रूडो यांची जुनी खोड आहे, असे खरमरीत प्रत्युत्तर भारताने सोमवारी दिले आहे.
कॅनडात चौकशी केली जात असलेल्या निज्जर हत्या प्रकरणात भारतीय उच्चायुक्तांसह काही अधिकाऱ्यांवर संशय आहे, असा संदेश कॅनडाने भारताला सोमवारी पाठविला होता. त्यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या कोणत्याही अधिकाऱ्याचा या हत्येत हात नाही. कॅनडाने आजवर कोणताही पुरावा या संदर्भात दिलेला नाही. कॅनडात आपले राजकीय स्थान टिकवून धरण्यासाठी ट्रूडो भारताच्या अधिकाऱ्यांवर बेछूट आरोप करीत असून या विरोधात भारताला कॅनडाविरोधात पुढील कारवाई करण्याचा अधिकार आहे. ट्रूडो यांचे आरोप सत्याधारित नसून कॅनडातील अंतर्गत राजकारणात ते भारताला विनाकारण ओढत आहेत, असे प्रत्युत्तर भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने दिले आहे.
प्रकरण काय आहे?
गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये कॅनडात शीख दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची हत्या करण्यात आली होती. या हत्येत भारताच्या काही अधिकाऱ्यांचा हात आहे, असा आरोप कॅनडाने केला होता. कॅनडाच्या संसदेत तसे स्पष्ट निवेदन जस्टीन ट्रूडो यांनी केले होते. त्यामुळे भारत आणि कॅनडा यांच्या संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. आता कॅनडाने या प्रकरणात थेट भारताच्या उच्चायोग अधिकाऱ्यांकडे बोट दाखविल्याने तणावात आणखी भर पडली आहे.
राजकीय आरोप
कॅनडाकडे पुरावे असतील तर त्याने ते द्यावेत, असे आवाहन भारताने अनेकदा केले आहे. तथापि, आजपर्यंत त्या देशाने एकही पुरावा दिलेला नाही, असे भारताचे प्रतिपादन आहे. कॅनडातील शीख समुदायाची मते ट्रूडो यांच्यासाठी महत्वाची आहेत. त्यामुळे ते शीख मतदारांना खूष करण्यासाठी खलिस्तानवादी शीखांचे समर्थन करतात. कॅनडातील सर्व शीख खलिस्तानवादी आहेत, अशी ट्रूडो यांनी स्वत:ची समजूत करुन घेतली आहे. त्यामुळे खलिस्तानवाद्यांचे समर्थन केले की शीख समुदायाची मते मिळतील आणि निवडणुकीत विजय मिळणे सोपे होईल, अशी ट्रूडो यांची भावना आहे. या राजकीय स्वार्थापोटी ते निज्जर प्रकरणात भारताला ओढत आहेत, असे अनेक राजकीय तज्ञांचेही मत आहे.
लाओस येथे भेट
आसिआन परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाओसच्या दौऱ्यावर असताना त्यांची ट्रूडो यांच्याशी चर्चा झाली होती. त्यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रूडो यांना भारताच्या भूमिकेची माहिती स्पष्ट शब्दांमध्ये दिली होती. कॅनडाने केलेले सर्व आरोप भारताने नाकारले असून पुरावा देण्याची सूचना केली असतानाही कॅनडाने अद्याप एकही पुरावा दिलेला नाही. त्यामुळे त्यांचे आरोप हे कॅनडातील राजकारणात त्यांची बाजू सावरण्यासाठी केलेला एक केविलवाणा प्रयत्न आहे, असा प्रत्यारोप भारताने त्यांच्यावर अनेकदा केलेला आहे.