शांतता परिषदेत भारताने सहभागी व्हावे
युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांचे मोदींना आवाहन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी अभिनंदन केले आहे. यानंतर त्यांनी 15-16 जून रोजी स्वीत्झर्लडमध्ये होणाऱ्या शांतता परिषदेत भारताने भाग घ्यावा असे आवाहन केले आहे. झेलेंस्की यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे.
पंतप्रधान मोदींना भारतात लवकर लवकर सरकार स्थापन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आम्ही जागतिक शांतता परिषदेवरही चर्चा केली आहे. भारत या परिषदेत सामील होईल अशी अपेक्षा असल्याचे झेलेंस्की यांनी सांगितले आहे. याचबरोबर झेलेंसकी यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेन दौऱ्याचे निमंत्रण दिले आहे. झेलेंस्की यांच्या अभिनंदनपद संदेशावर मोदींनी त्यांचे आभार मानले आहेत. अध्यक्ष झेलेंस्की यांच्याशी बोलून आनंद झाला. आम्ही दोघांनीही भारत आणि युक्रेनची भागीदारी मजबूत करण्यावर सहमती दर्शविल्याचे मोदींनी सांगितले आहे.
युक्रेनचा 10 सूत्री प्लॅन
स्वीत्झर्लंडमध्ये होणाऱ्या युक्रेनच्या शांतता परिषदेचा उद्देश रशिया-युक्रेनदरम्यान अडीच वर्षांपासून सुरू असलेले युद्ध संपविण्याशी निगडित पर्यायांवर चर्चा करणे आहे. याकरता युक्रेनने 10 सूत्री प्लॅनही तयार केला आहे. या प्लॅनमध्ये युक्रेनमधून रशियाच्या सैन्याची वापसी आणि युद्धगुन्ह्यासाठी रशियाला जबाबदार ठरविण्याचा मुद्दा सामील आहे. परंतु या परिषदेत रशियाला निमंत्रित करण्यात आलेले नाही. स्वीत्झर्लंडच्या विदेश मंत्रालयानुसार आतापर्यंत 80 देशांनी या परिषदेत भाग घेणार असल्याची पुष्टी दिली आहे. तर झेलेंस्की यांच्या प्रवक्त्यानुसार परिषदेत 107 देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी सामील होण्यासाठी सहमती दिली आहे. तर अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी या परिषदेत सामील होण्यास नकार दिला आहे. त्यांच्याजागी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस परिषदेत सामील होतील.
रशियाकडून आरोप
मागील महिन्याच्या अखेरीस चीनने या परिषदेत सामील होण्यास नकार दिला होता. स्वीस परिषदेदरम्यान युक्रेन अन्य देशांना रशियाच्या विरोधात भडकवून स्वत:च्या बाजूने वळवू पाहत असल्याचा आरोप रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी केला आहे. चीनने एक परिषद आयोजित करावी, ज्यात युक्रेन आणि रशिया दोघांनाही निमंत्रित पेले जावे, याद्वारे शांततेवर चर्चा होऊ शकेल अशी सूचना रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी केली आहे.
भारताची भूमिका
यापूर्वी 20 मार्च रोजी पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्रपती पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांना एकाच दिवशी फोन केला होता. काही तासांच्या फरकाने दोन्ही नेत्यांशी झालेल्या संभाषणात मोदींनी युद्ध रोखण्याचे आवाहन केले होते. रशिया-युक्रेमधील युद्धावर कूटनीति आणि चर्चेद्वारे तोडगा काढण्यात यावा. नेहमीच युद्ध लवकर संपविण्यास आणि शांततेचे समर्थन करत असल्याची भूमिका भारताने मांडली आहे.